पिंपरी / चिंचवड

तळेगाव, भोसरी, वाकड, निगडीतून 11 लाख 73 हजारांच्या चार चो-या

पिंपरी l प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे, एमआयडीसी भोसरी, वाकड आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. या चारही घटनांमध्ये 11 लाख 73 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. 24) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेश विष्णू आगळे (वय 37, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. 23) दुपारी साडेपाच ते रविवारी (दि. 24) सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून रोख रक्कम, सोन्याचे, चांदीचे दागिने, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वस्तू असा एकूण चार लाख चार हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

मारुती नथुराम खाणजोडे (वय 30, रा. भोसरीगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी मधील व्हीआयपी चौकाजवळ बसवेश्वर कॉम्प्लेक्स येथे असेलेल्या दोन विद्युत रोहीत्रातून अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपयांचे 1 हजार 200 लिटर ऑईल चोरून नेले. ही घटना 21 ते 24 एप्रिल या कालावधीत घडली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

विजयकुमार गोपिराम रमणानी (वय 57, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोबीन थॉमस (वय 43, रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जोबीन हा फिर्यादी यांच्याकडे कामाला आहे. शनिवारी (दि. 23) त्याने आंबेगाव, हांडेवाडी, हडपसर, उरुळीकांचन या ठिकाणाहून नेहमीच्या कस्टमरकडून उधारीचे पाच लाख 98 हजार 720 रुपये रक्कम जमा केली. आरोपीला वापरण्यासाठी दिलेली दुचाकी आणि जमा झालेली रोख रक्कम घेऊन आरोपी पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

सुनीता दिनेश जायसवाल (वय 61, रा. धानोरी, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रविवारी प्रतिशिर्डी येथे पीएमपीएमएल बसने जात होत्या. निगडी बस थांब्यावर फिर्यादी उतरल्या असता त्यावेळी फिर्यादी आणि पूजा भोसले या महिलेचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेले. त्यात मंगळसूत्र, सोन्याची बांगडी, मोबाईल फोन, रोख रक्कम, कागदपत्रे असा एकूण एक लाख 10 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button