TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी गोवरने रुग्णाचा बळी

मुंबई : मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी गोवरने रुग्णाचा बळी घेतला. गोवंडीतील आठ महिन्यांच्या मुलाचा गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील गोवर रुग्णांच्या मृत्यूची संख्या १३ झाली असून, यामध्ये तीन मृत्यू हे मुंबईबाहेरील तर, दोन मृत्यू संशयित आहेत. मुंबईमध्ये गुरुवारी गोवरचे १९ रुग्ण सापडले असून, गोवरच्या रुग्णांची संख्या २५२ झाली. तसेच बरे झालेल्या ३६ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

केंद्र सरकारने ६ ते ९ महिन्यांमधील बालकांना गोवरची लस देण्याचे आदेश देऊन काही कालावधी उलटण्यापूर्वीच मुंबईमधील गोवंडीतील एका आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. २० नोव्हेंबरला ताप आणि पुरळ येऊन श्वसनाचा त्रास झाल्याने त्याला मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१० वाजता विशेष रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. रुग्णावर सर्व उपचार सुरू होते. मात्र २४ नोव्हेंबरला त्याची प्रकृती खालावत गेली आणि दुपारी १.१० वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील मृतांची संख्या १३ वर पोहोचली.

यातील दोन मृत्यू संशयित आहेत. मुंबईमध्ये गुरुवारी गोवरचे १९ रुग्ण सापडल्याने मुंबईतील रुग्णसंख्या २५२ इतकी झाली. गोवंडीमध्ये गुरुवारी सर्वाधिक तीन रुग्ण सापडले असून, कुर्ला, चेंबूर, भायखळा आणि प्रभादेवी या भागांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण, तसेच चंदनवाडी, ताडदेव गोरेगाव पश्चिम, घाटकोपर, भांडुप या विभागांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

संशयित रुग्णांची संख्या ३६९५

 मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी १६१ संशयित रुग्ण आढळल्याने संशयित रुग्णांची संख्या ३ हजार ६९५ इतकी झाली.  यापैकी ३४ रुग्णांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे मुंबईतील विविध रुग्णालयांतील ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button