Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

दक्षिण गडचिरोलीत आलेल्या पुरामुळे चार हजारांवर घरांसह सुमारे ६०० कोटींहून अधिकचे नुकसान

गडचिरोलीः दक्षिण गडचिरोलीत आलेल्या पुरामुळे चार हजारांवर घरांसह सुमारे ६०० कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. नुकसानीच्या सर्वेक्षणानंतर नेमका आकडा समोर येणार आहे.

या पुराने गोदावरी नदीला आलेल्या १९८६च्या महापुराचा विक्रम मोडला आहे. शेकडो कुटुंबाचे संसार उघड्यावर आले असून, शेतीही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित बिघडले आहे. दहा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अहेरी, सिरोंचा, मुलचेरा, भामरागड तालुक्याला फटका बसला. प्राणहिता नदीकाठावर असलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. सिरोंचा तालुक्याला सर्वाधिक झळ बसली. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील हा तालुका प्राणिहता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांनी वेढलेला आहे. गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पातून तब्बल २६ लाख क्‍युसेक्स पाणी सोडले गेले होते. त्याचा सहयोगी प्रकल्प असलेल्या येल्लमपल्ली धरणातूनही पाणी सोडण्यात आले. परिणाम गावांमध्ये पाणी शिरले. महसूल आणि पोलिस प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून रात्रीत गावे रिकामी केली. जीवनावश्यक सामानांसह सारेकाही पुराने हिरावून घेतले. पूर ओसरल्यानंतरही गावकरी अजूनही घरात परतू शकलेले नाहीत. घरांमध्ये गाळ आणि चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. चिंतरेवला, आयपेठा, नडीकुठा, सोमनूर, सोमनपल्ली येथील नागरिकांनी पूर ओसरल्यानंतर घरी परतण्याऐवजी रस्त्याच्या दुतर्फा आणि जंगलात प्लास्टिकचे तंबू टाकून मुक्काम ठोकला होता. पुरामुळे काही रस्ते वाहून गेले आहेत. गोदावरी नदीवरील आंतरराज्यीय पुलाचा अॅप्रोच रस्ता वाहून गेल्याने वाहतूक प्रभावित झाली.

१४ गावांत शिरले पाणी

सिरोंचासह नदीकाठावरील १४ गावांमध्ये गोदावरीचे पाणी शिरले. या गावांतील धान, कापूस, मिरची आणि मक्याची शेती वाहून गेली. नगरम आणि अरडा गावातील ५०० एकर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आला आहे. तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर पाच वर्षांपूर्वी ८० हजार कोटी रुपये खर्च करून मेडीगड्डा-कालेश्वर हा सिंचन प्रकल्प उभारला. तेलंगणची तहान भागविणारा हा प्रकल्प असला तरी दरवर्षी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांना या पुराचा फटका बसतो. यावर्षी पुराने कहर केल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये रोष आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी पोलिस अधीक्षकांसोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या नियोजनामुळे एकाचाही जीव गेला नाही, हे विशेष.

५४ जणांचा चमू दाखल

पूरग्रस्त भागात प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. बाहेरून तब्बल ५४ जणांचा चमू सिरोंचात मदत पाठविण्यात आला आहे. अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दोन दिवस सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. एकट्या सिरोंचा तालुक्यात ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सरकारने विशेष बाब म्हणून या भागाला मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button