breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर येथे रंगणार पहिले शिक्षक साहित्य संमेलन

कवी डॉ. हबीब भंडारे संमेलनाचे अध्यक्ष, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना संमेलनाचे उदघाटक

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन प्रसिद्ध शिक्षक कवी, लेखक, गीतकार डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी दिलीप सिरसाठ व रमेश ठाकूर यांनी दिली.

शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हे संमेलन अग्रसेन विद्यामंदिर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार असून या संमेलनाचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होईल, तर प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक); जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक); अरुणा भूमकर, शिक्षणाधिकारी (योजना) हे काम पाहतील.

शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक मोलाचे योगदान देत आहेत. या शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर आयोजित शिक्षकांनी शिक्षकांसाठी भव्य स्वरूपात भरवले जात असलेले हे जिल्ह्यातील पहिलेच शिक्षक साहित्य संमेलन ठरणार असून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा; कनिष्ठ महाविद्यालये येथे कार्यरत असणारे शिक्षक यात सहभागी होणार आहेत.

या शिक्षक साहित्य संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद आणि चित्रप्रदर्शन यांचा समावेश असून ४०० हून अधिक शिक्षक यात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – ‘पुणे की पसंत मोरे वसंत!’; वसंत मोरेंचं आजचं स्टेटस चर्चेत

ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या हस्ते ४० हून अधिक शिक्षक कलावंतांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी अधिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत आणि रवींद्र मार्डिया यांची प्रमुख उपस्थिती असेल.

पहिल्या सत्रात संमेलनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होईल, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची उपस्थिती असेल. संमेलनाध्यक्ष डॉ. हबीब भंडारे यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. याच कार्यक्रमात १३८ हून अधिक शिक्षक कवींच्या कवितांचा समावेश असलेला ‘काव्यदिंडी’ हा संपादित कवितासंग्रह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केला जाणार आहे.

दुसऱ्या सत्रात ‘शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर प्रभाव’ या विषयावर डॉ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यात मेघना गोरे, अनिल देशमुख, संजय कुलकर्णी, शेख शब्बीर, डॉ. शिवानंद भानुसे, डॉ. विनोद सिनकर हे शिक्षक साहित्यिक सहभागी होणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात नामदेव निकम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडेल, यात दीपक सोनवणे, खान जिनत फरहीन वजाहत अली, रुपाली बंडाळे, वैशाली साबदे, अश्विनी सोनवणे, कुमार बिरदवडे, किरण गाडेकर हे शिक्षक कथाकार सहभागी होणार आहेत. त्यानंतर भव्य कविसंमेलन ज्येष्ठ कवी प्रा. श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून यात ५६ हून अधिक शिक्षक कवी सहभागी होणार आहेत. शेवटच्या सत्रात संमेलनाचा समारोप समारंभ प्रसिद्ध बालसाहित्यिक, अनुवादक डॉ. विशाल तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button