पिंपरी / चिंचवड

महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिविगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे l प्रतिनिधी

थकबाकी असताना देखील वीजपुरवठा खंडित का केला अशी विचारणा करीत शिविगाळ करुन धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भोसलेनगर येथील एका आरोपीविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या शिवाजीनगर विभाग अंतर्गत मोतीबाग शाखा कार्यालयाचे जनमित्र जयवंत साळुंखे हे सहकारी लखन आरे यांच्यासमेवत बुधवारी (दि. 16) वीजबिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कर्तव्य बजावत होते. यामध्ये सकाळी 11.15 वाजता रेंज हिल्स रोड, भोसलेनगरमधील वृंदावन अपार्टमेंटमधील क्षीतिजा राजू सोनुले नामक ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

त्यानंतर हे दोघेही जनमित्र राजेश्री व्हीला येथे असताना त्याठिकाणी अभिजित राजू सोनुले या व्यक्तीने ‘आमच्या घराची लाईट कट का केली’ अशी विचारणा करीत श्री. साळुंखे यांची कॉलर धरली व शिविगाळ सुरु केली. वीजपुरवठा सुरु केल्याशिवाय जाऊ देणार नाही असे म्हणत सरकारी कागदपत्रे हिसकावून फाडून टाकले. यानंतर महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन मुंडे, सचिन चौधरी त्या ठिकाणी गेले. त्यांनाही आरोपीने शिविगाळ केली व मुंडे यांना साईडला ढकलले. सहायक अभियंता संध्या पाटील यांनीही वस्तुस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीची अरेरावीची भाषा सुरु राहिली. यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ येऊन मदत केली.

याप्रकरणी अभिजित राजू सोनुले (रा. भोसलेनगर) विरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात कलम 353, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button