breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Festival of Future : तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करावी : डॉ. माशेलकर

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

तरुणांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी त्यांच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करावी. या महोत्सवाच्या निमित्ताने युवा उद्योजकांना गुंतवणूकदारांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यामाध्यमातून आपल्या उद्योगासाठी भांडवल उभे करण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत पद्मविभूषण व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान आयोजित फेस्टीवल ऑफ फ्युचर या महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

.यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य राजेंद्र गावडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता अशोक भालकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, सर्वप्रथम मी अशा प्रकारच्या महोत्सवाच्या आयोजनासाठी महानगरपालिकेचे आभार मानतो. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञान व विश्वास महत्वाचा असतो. युवकांनी अपयशाने खचून न जाता यशस्वी होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवावेत. फक्त नाविन्यपूर्ण कल्पना असून उपयोग नाही तर त्या कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवणे देखील आवश्यक आहे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या स्टार्टअपसना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नवे युग हे आशियाई देशांचे असून पुणे व पिंपरी चिंचवड सारखे शहर उद्योगांचे प्रमुख केंद्र बनणार आहे. स्टार्टअप इंडियामुळे एका चळवळीला सुरुवात झाली आहे. आज चीनकडून मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक होत असून हे चित्र बदलण्यासाठी देशातील गुंतवणूकदरांनी स्टार्टअपसमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कठीण परिश्रमाला पर्याय नसून युवा उद्योजकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या यशावर समाधानी होऊन थांबणे योग्य नाही असेही ते म्हणाले.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, फेस्टिवल ऑफ फ्युचर या महोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरासाठी सुवर्ण युगाची सुरुवात झाली आहे. पदवी मिळविल्यानंतर काय करायचे हा प्रश्न तरुणांसमोर उभा राहतो या महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना चांगले मार्गदर्शन मिळणार आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराचे व देशाचे भविष्य युवकांच्या हाती आहे. फेस्टिवल ऑफ फ्युचरच्या माध्यमातून महानगरपालिकेला शहरातील स्टार्टअपसची माहिती मिळण्यास मदत झाली आहे. महानगरपालिका अशा महोत्सवाच्या माध्यमातून स्टार्टअपसच्या पाठीशी उभी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड हि दोन शहरे नाविन्याची राजधानी म्हणून ओळखली जातात. पुणेरी पाट्यांपासून ते खाद्य संस्कृतीपर्यंत येथे सर्व गोष्टींमध्ये नाविन्य दिसून येते.या महोत्सवामध्ये सादर होणा-या सर्वात अनोख्या अशा काही स्टार्टअपसना महानगरपालिका आपल्या कामकाजामध्ये समाविष्ठ करून घेणार असून त्यांचा वापर नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी होणार आहे, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button