breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला फडणवीसांच उत्तर; म्हणाले, “त्यांना तर….”

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर देशांचं उदाहरण देताना त्यांनी केलेल्या उपाययोजनांकडे पाहण्याचाही सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी इतर देशांनी जाहीर केलेल्या पॅकेज, मदतीची माहितीही दिली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पण हे सगळं तिथल्या केंद्र सरकारनी केलं आहे असा टोला लगावला होता. आव्हाडांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचं कारण महाराष्ट्रातील एकमेव सरकार आहे ज्यांनी कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज गेल्या वर्षभरात दिलं आहे. देशातील इतर राज्यांनीही पॅकेज दिलं आहे. फक्त महाराष्ट्राने एक पैशांचं पॅकेज तर दिलंच नाही पण त्याऐवजी लोकांचं वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं यावरच भर दिला आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“संपूर्ण कोव्हिडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना जगभरातील देशांचं उदाहरण दिलं. त्यांनी काय केलं हेदेखील पाहिलं पाहिजे. त्यानंतर त्या देशांचं उदाहरण दिलं पाहिजे,” असा सल्ला फडणवीसांनी दिला. “मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या का वाढत आहे? महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती. नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यानंतर सरकार काय व्यवस्था करणार आहे? पुण्याला काय करणार आहे? किंवा राज्यातील इतर भागात संख्या वाढत असताना बेड मिळत नाही, व्यवस्था नाही याचं उत्तर द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला,” अशी टीका फडणवीसांनी केली. “कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही. काय उपाययोजना करणार सांगितलं नाही. लॉकडाउन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागंत. पण तो अपवाद आहे, नियम नाही. लॉकडाउन करायचा असेल तर प्रत्येकाचा विचार करावा लागेल,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीसांनी सल्ला देताना काय म्हटलं आहे –
फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…

हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…

डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…

ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत !

बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…

पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…

आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…

फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…

युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…

“तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल,” असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे.

“होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचा- ममता बॅनर्जींनी मतदान केंद्रावरुन थेट राज्यपालांना केला फोन; म्हणाल्या…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button