breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अखेर ‘त्या’ संशयास्पद बोटीचे गूढ उकलले; अडकलेल्या खलाशाची २६ तासांनी सुटका

वसई |

वसईच्या भुईगाव समुद्रात गुरुवारी आढळलेल्या संशयास्पद बोटीचे गूढ अखेर उलगडले आहे. ही मालवाहू बोट असून भरकटून ती भुईगावच्या खडकाळ समुद्र किनारी अडकली होती. तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने बोटीत अडकलेल्या एका खलाशाची २६ तासांनी सुखरूप सुटका केली. वसईच्या भुईगाव समुदात गुरुवारी सकाळी एक संशयास्पद बोट आढळली होती. ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून दोन नोटिकल मैल आतमध्ये होती. तो भाग खडकाळ असल्याने कोणाला त्या बोटीजवळ जाता येत नव्हतं. गुरुवारी संध्याकाळपर्यत पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने बोटीचा तपास करत होते. मात्र काहीच माहिती मिळत नसल्याने संशय वाढला होता. रात्र झाल्याने तपास थांबविण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी पुन्हा तपास मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान बोटीत एक इसम असल्याचे समजले. त्यानंतर सकाळी १० वाजता तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर पाठवून त्या खलासाची सुटका करण्यात आली.

ही बोट मालवाहतूक करणारी असून भाईंदरच्या उत्तन येथील आहे. गुरुवारी बोट उत्तन किनाऱ्यावर उभी होती. बोटचालक किनाऱ्यावर गेला असता अचानक बोटीचा दोर तुटला आणि बोट भरकटून या भागात आली अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण करपे यांनी दिली. बोटीत काहीच संशयास्पद प्रकार नसून बोटीवरील तो खलाशी आणि बोट मालकाकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बोटीवरील रफिक शेख हा खलाशी २६ तास बोटीत अडकून होता. बोट मालक राफटर काळोखे याने सकाळी पोलिसांना कळवल्यानंतर या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. बोट बेपत्ता झाल्यानंतर मालकाने स्वतः शोध सुरू केला होता. मात्र त्याने पोलिसांना कळवले नव्हते. जर त्याने वेळीच पोलिसांना कळवले असते तर ही संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली नसती आणि सर्व यंत्रणेचा वेळ वाचला असता, अशी माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली. या प्रकरणी बोट मालकावर हलगर्जीपणा केल्याबाबद्दल गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का याची पोलीस चाचपणी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button