breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘माफी मागितली असली, तरी बंडातात्या कराडकरांवर कारवाई होणार’; महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश

मुंबई | प्रतिनिधी 
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून महिलांनी महिला आयोगाकडे तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. या वक्तव्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘बंडातात्या कराडकर यांनी काल (3 फेब्रुवारी) सातारा येथे एका आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे विधान केलं. ते विधान वादग्रस्त आणि संतापजनक आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाविरोधात राज्यातील महिलांना राज्य महिला आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत’, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

‘बंडातात्या कराडकर यांच्या विधानामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. राज्यभरातून आलेल्या महिलांच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. कालच (३ फेब्रुवारी) बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करून कारवाईचा अहवाल ४८ तासांत सादर करण्याचे निर्देश सातारा पोलिसांना राज्य महिला आयोगाने दिले आहेत’, अशी माहिती चाकणकर यांनी यावेळी दिली.

‘निर्देश दिल्यानंतर कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणामध्ये बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल,’ असंही महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘त्यांनी (बंडातात्या कराडकर) माफी मागितली…. खरंतर वारंकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करतो. त्यामुळे वारकरी संप्रदायातील व्यक्तीने आपलं म्हणणं मांडत असताना किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी महिलांचा अशा पद्धतीने अपमान करणं, हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. त्यामुळे जरी त्यांनी माफी मागितली असेल, तरी अशा प्रकारचं वक्तव्य करणं निंदनीय आहे. समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीने महिलांबद्दल असं विधान करणं ही पुढे परंपरा पडू नये. केवळ बंडातात्या कराडकरच नाही, तर समाजातील कोणत्याही व्यक्तीने महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी अशी जर विधान केली, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,’ असं चाकणकर म्हणाल्या.

‘बंडातात्या कराडकर यांनी केवळ राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबद्दलच नाही, तर स्थानिक आमदार, इतर नेते यांच्याबद्दलही बेताल वक्तव्ये केलेली आहेत. कुणाच्याही आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीची वक्तव्ये करणं चुकीचं आहे. कोणताही पुरावा नसताना अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल’, असंही चाकणकर यांनी स्पष्ट केलं.

‘हभप म्हणून जे नावासमोर लावलं जातं, ती पदवीही मलिन करण्याचं काम त्यांनी केलं आहे. कोणतीही परवानगी न घेता त्यांनी जमाव गोळा करून आंदोलन केलं. ते चुकीचं होतं. समाजाला दिशा देण्याचं काम करत असताना चुकीची वर्तणूक करणं निंदनीय आहे. कपाळावर टीळा आणि गळ्यात माळा घालून ज्या पद्धतीची वक्तव्ये करण्यात आली, त्याचा निषेध महाराष्ट्रातून झाला आहे’, असंही चाकणकर यांनी म्हटल आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button