प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन
कला विश्वावर मोठी शोककळा, झाकीर हुसेन यांनी तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले
मुंबई : प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे रविवारी, १५ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले आहे. याआधी रविवारी हुसैन यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे सॅन फ्रान्सिस्कोच्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. याची माहिती त्यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी पीटीआयला दिली होती.
कशी होती त्यांची कारकिर्द?
झाकीर हुसेन यांनी तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले होते. ते देखील एक अभिनेते होते. त्यांनी 12 चित्रपटांमध्ये काम केले. उस्ताद झाकीर हुसैन यांनी 1983 मध्ये आलेल्या ब्रिटिश चित्रपट ‘हीट अँड डस्ट’मध्ये शशी कपूरसोबत काम केले होते. हा त्याचा अभिनयातील पहिला चित्रपट होता. याशिवाय ते 1998 मध्ये आलेल्या ‘साज’ चित्रपटात दिसले होते. यामध्ये शबाना आझमी यांनी त्यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
9 मार्च 1951 रोजी जन्मलेल्या झाकीर हुसैन यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ तीन ग्रॅमी पुरस्कारच जिंकले नाहीत तर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारही मिळाले. त्यांचे वडील उस्ताद अल्ला राखा कुरेशी हे देखील तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीताच्या जगात प्रवेश केला. लहानपणापासूनच तबला वादनाकडे त्यांचा कल होता.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट करून सर्वांना चकित केले. त्याने वयाच्या 12 व्या वर्षी वडिलांसोबत मैफिलीला जायला सुरुवात केली. झाकीर हुसेन हे अमेरिकेतही प्रसिद्ध होते. 2016 मध्ये, त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यात सहभागी होणारे झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार होते.





