स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
मारहाणीची पोलिसांनी दखल घेतली नाही, प्रणित मोरेचा आरोप
![Stand-up comedian Praneet More beaten up; Information shared on Instagram](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Stand-up-comedian-Praneet-More-was-beaten-up-he-shared-the-information-on-Instagram-780x470.jpg)
PraniT More | मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक व्हिडीओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, त्याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. सोलापुरात त्याचा शो संपल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. याबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने माहिती दिली. बॉलीवूडमध्ये नुकताच पदार्पण केलेला अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला ही मारहाण करण्यात आल्याचं प्रणित मोरेने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर प्रणितने पोस्ट शेअर केलीये. त्यात लिहिण्यात आलं आहे की, नुकत्याच घडलेल्या एका भयंकर घटनेबद्दल आम्हाला बोलायचं आहे. २ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी प्रणित मोरेचा २४K क्राफ्ट ब्रूझ, सोलापूर येथील शो संपला. स्टँडअप शोनंतर प्रणित नेहमीप्रमाणे त्याच्या सगळ्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी आला. गर्दी कमी झाल्यावर ११ ते १२ जणांचा एक गट त्याच्याजवळ आला. पण, हे लोक फोटो काढण्यासाठी आले नव्हते. त्यांनी प्रणितला मारहाण करून धमकी दिली. त्या जमावाने अतिशय क्रूरपणे प्रणितवर हल्ला केला. लाथा मारल्या, यामुळे प्रणित जखमी झाला आहे. तन्वीर शेख या टोळीचा प्रमुख होता. बॉलीवूडचा नवोदित अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. त्या जमावातील एकाने, “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” अशी धमकीही दिली आहे. त्याच्याबद्दल पुन्हा वक्तव्य केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही प्रणितला देण्यात आलाय. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, २४K क्राफ्ट ब्रूझ याठिकाणी कोणतीही सुरक्षा नव्हती. अनेकदा विनंती करूनही ते लोक आता सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहेत. या फुटेजमध्ये महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. आम्ही पोलिसांशी देखील संपर्क साधला त्यांनी मदतीचे आश्वासन दिले पण, तसे केले नाही.
हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडका भाऊ मोठा; एकनाथ शिंदे यांचं विधान
दरम्यान, प्रणितने या पोस्टमध्ये सोलापुरातील शो दरम्यान वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने त्याला मारहाण झाल्याचा दावा केला आहे. वीर पहारियाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली. वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारानंतर वीरने देखील पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.