उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या धाकट्या चिरंजीवाचं ठरलं; सुप्रिया सुळेंनी शेअर केले ‘जोडीचे’ फोटो

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जय पवारांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ऋतुजा असे जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. नव्या जोडीने शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले.
जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. ते राजकारणापासून काहीसे बाजूला आहेत. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवली तसेच पाठोपाठ राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याने बारामतीमधील जनतेचे प्रश्न जाणून घेण्याकरिता जय पवार यांनी पण राजकारणात पाऊल ठेवले आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक, विविध विकास कामांवर चर्चा
अजित पवार आणि त्यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे राजकीय विरोधक आहेत. मात्र कुटुंबात राजकारण आणले जात नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यांनी जय पवार आणि ऋतुजा यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोत कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत. जय आणि ऋतुजा तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन… आनंदी राहा, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद असे कॅप्शन लिहित खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासमवेतची काही खास क्षणचित्रे शेअर केली आहेत. लवकरच दोघांचा साखरपुडा समारंभ होणार असल्याचे कळते.
पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार यांचा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला आहे. सध्या मुंबई, बारामती येथे ते व्यवसाय पाहत असल्याचे सांगितले जाते. परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणातही सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते.