सलमान माफी का मागेल? त्याने काय गुन्हा केला; सलीम खान यांची प्रतिक्रिया

Salim Khan | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकीची हत्या १२ ऑक्टोबरला झाली. त्यानंतर अभिनेता सलमान खानला लॉरेन्श बिश्नोई गँगकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्यानंतर सलीम खान यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
सलीम खान म्हणाले, बाबा सिद्दीकींची हत्या ज्या प्रकारे झाली त्याचं आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलं. त्याने अनेक लोकांची मदत केली होती. बाबाला मी खूप दिवसांपासून ओळखत होतो. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मला वाईट वाटलं. बाबा सिद्दीकीला मी सांगितलं होतं जिंदगी और मौत खुदा के हातमें है. असं सलीम खान यांनी सांगितलं. तसंच सध्या जो माफी मागण्याचा सल्ला सलमानला दिला जातो आहे त्यावर सलीम खान म्हणाले कशाची माफी मागायची? गुन्हा केला असेल तर माफी मागणार ना? असं ते म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी विधानसभा : ठाकरे गटात उमेदवारीसाठी ‘इनकमिंग’; निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर!
माफी त्या व्यक्तीकडे मागितली ज्याला धोका दिला, पैसे खाल्ले, त्रास दिला असेल तर माफी मागितली जाते. मी महात्मा गांधींचा अनुयायी आहे. मी काय म्हणणार महात्मा गांधींजी मला माफ करा? असं तर होणार नाही. मी त्यांचा अनुयायी आहे. पाच कोटी रुपये द्या आम्ही माफ करु. आम्ही सुरुवातीपासूनच हे म्हणत आहोत की हे सगळं प्रकरण खंडणीचं आहे, असं सलीम खान म्हणाले.
सलमान खानने माफी कसली मागायची? सलमानने माफी मागितली तर ही बाब सिद्ध होईल की त्याने काळवीट मारलं. त्याने शिकार केलेलीच नाही. मी आजवर कधीही कुठल्या प्राण्याला मारलेलं नाही. सलमाननेही आजवर एकही प्राणी मारलेला नाही. आम्ही झुरळही मारलेलं नाही. आम्ही या गोष्टींवर विश्वासच ठेवत नाही. एकदा एक मुलगी म्हणाली होती की सलीम खान खूप सभ्य आहेत. ते मॉर्निंग वॉक करताना वरही बघत नाहीत खाली पाहून चालतात. मी त्या मुलीला सांगितलं आपण चालताना काही किडे, माशा, इतर छोटे प्राणी पायाखाली चिरडून मरु नयेत म्हणून मी खाली पाहून चालतो असं उत्तर मी त्या मुलीला दिलं होतं. मी मुक्या प्राण्यांवर प्रेम करतो. तसंच सलमानचंही खूप प्रेम आहे, असं सलीम खान म्हणाले.
Being Human च्या मार्फत आम्ही प्राण्यांनाही जीवदान दिलं आहे. मला आठवतं त्याप्रमाणे सलमानने एक कुत्रा पाळला होता. तो त्याला मित्रासारखं सांभाळत होता. तो कुत्रा जेव्हा मेला तेव्हा सलमान खूप रडला होता. मी जेव्हा काळवीटाची शिकार झाली तेव्हा सलमानला विचारलं की हे कुणी केलं? त्यावर तो मला म्हणाला की मी तिथे नव्हतो. तो माझ्याशी खोटं बोलणार नाही. जनावारांची शिकार करणं त्याला आवडत नाही. तसंच Being Human च्या माध्यमातून आम्ही लोकांचीही भरपूर मदत केली आहे. रोज लोक रांग लावायचे. नंतर कोर्ट केस झाल्यावर कलम १४४ लावण्यात आलं. त्यामुळे आता लोक येत नाहीत, असंही सलीम खान म्हणाले.





