Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी विधानसभा : ठाकरे गटात उमेदवारीसाठी ‘इनकमिंग’; निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर!

निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळावा, पक्षश्रेष्ठींकडे मागणी

निवडणूक उमेदवारीसाठी कोणी पक्षात येत असेल, तर घेवू नका!

पिंपरी | पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व संपवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी अभद्र युती केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निवडून येणारी जागा घ्यावी. तसेच, उमेदवारी आणि निवडणुकीसाठी ‘इनकमिंग’ करताना निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातील निष्ठावंतांकडून केली जात आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरीपैकी एक मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. पिंपरी मतदार संघात माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार आणि शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील माजी नगरसेविका सीमा सावळे ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील निष्ठावंतांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून, निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

 हेही वाचा    –    शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार? कुणाला मिळणार उमेदवारी, वाचा यादी..

शिवसेना महिला संघटीका सुलभा उबाळे म्हणाल्या की, पक्षवाढीसाठी प्रवेश होत असतील, तर त्याचे स्वागत आहे. मात्र, निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवेश होणार असतील, तर निष्ठावंतानाही विश्वासात घेतले पाहिजे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिरुर लोकसभा मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढले. त्यावेळी राष्ट्रवादीचा एकही मोठा पदाधिकारी काम करण्यासाठी तयार नव्हता. शिवसैनिकांनी ही निवडणूक हाती घेतली आणि निष्ठेने काम केले. मात्र, आता खासदार अमोल कोल्हे भेटायलासुद्धा तयार नाहीत. आम्ही फक्त पायरी म्हणून रहायचे काय? असा प्रश्न आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. त्यामुळे पिंपरी विधानसभेसह भोसरी आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

कारण, पूर्वी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशाला विरोध करण्यासाठी निष्ठावंतांकडून वज्रमूठ करण्यात आली आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ मिळवण्यासाठी ‘मेल’ केला असून, लवकरच निष्ठावंत पदाधिकारी त्यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, शहरातील तीन मतदार संघामध्ये पक्षाचे सक्षम उमदेवार आहेत. पण, निवडून येण्याची क्षमता असलेल्या ठिकाणी पक्षाचे जागा घ्यावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

गावकी-भावकी आमदार बनसोडे यांच्या पाठिशी..

पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत, भाजपाच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, ठाकरे गटाचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मयूर जाधव, देवेंद्र तायडे असे अनेकजन इच्छुक आहेत. मात्र, पिंपरी, दापोडी, आकुर्डी, चिंचवड या भागातील स्थानिक कायम बनसोडे यांच्या पाठिशी राहिले आहेत. त्यातच भ्रष्टाचार आणि स्थानिक व बाहेरचा असा वाद निर्माण होणार असून, स्थानिक गावकी-भावकी बनसोडे यांना साथ देईल. दबावाचे आणि ‘ब्लॅक मेलिंग’चे राजकारण करणाऱ्यांना बाजुला ठेवतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button