प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा साधना सरगम यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी समारोप
नागपूरच्या स्वरसंगम कल्चरल फोरमने सादर केलेल्या भरतनाट्यमला रसिकांची चांगली दाद
![Regional Culture Festival concludes with melodious songs sung by Sadhana Sargam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Sadhna-Sargam-780x470.jpg)
पुणे : भारत सरकार संस्कृती मंत्रालय, पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृहात सुरू असलेल्या प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा साधना सरगम यांनी गायलेल्या सुमधुर गीतांनी समारोप झाला.
तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागपूरच्या स्वरसंगम कल्चरल फोरमने सादर केलेल्या भरतनाट्यमला रसिकांची चांगली दाद मिळाली. या कलापथकाने प्रथम अलारिप्पू नृत्यप्रकार सादर केला. अभंगाच्या साथीने श्री विठ्ठलाला नमन केले. यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘वैष्णव जन तो..’ या आवडत्या भजनावर भरतनाट्यम सादरीकरण करण्यात आले. वंदे मातरम सादरीकरणही तेवढेच सुंदर होते.
साधना सरगमच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध..
साधना सरगम यांनी गायलेल्या सुमधुर चित्रपट गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी गायलेल्या हिंदी चित्रपट गीतांना रसिकांनी ठेका धरून दाद दिली. ‘सात समुंदर पार…’, ‘पहेला नशा पहला खुमार…’, ‘नीले नीले अंबर मे’ या गीतांना श्रोत्यांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. आठ राज्यातील लोककलाकारांनीही रंगतदार सादरीकरण केले.
आर्मी पब्लिक स्कूलच्या मुलांनी साकारली गोंड, वारली, मांडणा..
महोत्सवादरम्यान चालणाऱ्या वारली कला शिबिर आणि कार्यशाळेचाही रविवारी समारोप झाला. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील २३ कलाकारांनी वारली चित्रकलेविषयी माहिती दिली.
आर्मी पब्लिक स्कूल दिघीच्या ५० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला. नामवंत कलाकारांकडून प्रशिक्षण घेत विद्यार्थ्यांनी मांडणा, गोंड आणि वारली कलेचे चित्रण केले. संस्कृती मंत्रालयाचे सहसचिव अमिता प्रसाद सरभाई, अवर सचिव पीएस खींची, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक किरण सोनी गुप्ता, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्रोफेसर शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.