मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न
१७ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा दादर शिवाजी पार्क परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. १७ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता लागलेली आहे. चित्रपटात भानुदास नावाच्या रस्त्यावरील विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा मांडण्यात आली आहे.
चित्रपटातील मुख्य भूमिका भूषण मंजुळे आणि नागराज मंजुळे यांनी साकारली असून प्रसाद ओकने पत्रकाराची महत्त्वाची व्यक्तिरेखा निभावली आहे. या चित्रपटातील पाच गाणी विविध प्रसंगानुसार सादर करण्यात आली आहेत. संगीतकार विनू थॉमस यांनी चार गाण्यांना संगीत दिले असून, ‘घाव दे जरा रा…’ या गाण्याचे संगीतकार शुभम भट आहेत.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
रोहित राऊत, सायली कांबळे, मुग्धा कऱ्हाडे, वैभव देशमुख आणि मनीष राजगिरे यांनी गाण्यांना आवाज दिला आहे. गुरू ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी गाण्यांचे लेखन केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिम्मी आणि रॉबिन यांनी केले असून लेखक सुधीर कुलकर्णी यांनी पटकथा तयार केली आहे. ‘रील स्टार’ हा चित्रपट संगीत, कथा आणि दृश्यरचना यांचा संगम आहे. चित्रपट १७ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.




