ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात योगेश सोमण संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणार

येत्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू इथं संत तुकाराम महाराज यांचं सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं. निमित्त होतं… ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील कलाकारांच्या देहू भेटीचं. पावसाच्या हलक्या शिडकावातही भक्ती, श्रद्धेच्या वर्षावाने रंग भरले अन् जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा दर्शन सोहळा उपस्थितांनी याप्रसंगी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. डोक्यावर वारकरी पगडी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा आणि हातात चिपळ्या असा वेष परिधान करून अभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेच्या रूपातील दर्शन यावेळी दिलं. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसणार आहे.

संत तुकाराम महाराज अवघ्या महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने स्थिरावले आहेत. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगरूपी अमृतवाणीने जीवनाची शाश्वत सत्ये सांगितली आणि जगण्याचं तत्त्वज्ञान मांडलं. मानवी जीवनाला परिपूर्णता प्राप्त करून देणारा हा सुखसंवाद आता ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट येत्या 7 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा      :          ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथा ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात, “तुकारामांच्या अभंगांमध्ये अध्यात्मिकतेचा साक्षात्कार आणि जीवनाची अर्थपूर्णता याचं अत्यंत सुंदर सार दडलेलं आहे. लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवनाचा अर्क प्रादेशिक सिनेमांमध्ये पुरेपूर उतरलेला असल्याने प्रेक्षकांना ते अधिकच जवळचे वाटतात.”

‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाची कथा आणि संवाद योगेश सोमण यांचंच असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल दहा अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी , अजय पुरकर, अवधूत गांधी, विराजस कुलकर्णी, अभिजीत श्वेतचन्द्र, नुपूर दैठणकर, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, ईश्मिता जोशी, रुद्र कोळेकर, अभीर गोरे, तेजस बर्वे आदि कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button