ताज्या घडामोडीमुंबई

आरोपी मिहीर शाहला अपघातानंतर दोन दिवसांनी जेरबंद करण्यात पोलिसांना यश

सरकारी वकिलांचा युक्तिवाद, आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

वरळी : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं. मिहीर शाह याला पोलिसांनी काल दुपारी अटक केली. तो अपघातानंतर सलग दोन दिवस पोलिसांना चकवा देवून फिरत होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना मोठं यश आलं. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं तेव्हा सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यात जोरदार खडाजंगी होताना दिसली. सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडत जास्तीत जास्त दिवस मिहीर शाह याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यानंतर कोर्टाने आरोपी मिहीर शाह याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

“आरोपी मिहीरने केस कापले असून दाढी काढली आहे. आरोपीने अपघातानंतर कारची नंबरप्लेट कुठे टाकलीय? त्याचा शोध घ्यायचा आहे. आरोपीने अपघातानंतर कोणाकोणाला संपर्क केला? त्याचा तपास करायचा आहे. आरोपीला कोणीतरी मदत केलेली आहे. त्याचीही माहिती घ्यायची आहे. गुन्ह्यातील कार कोणाच्या नावावर आहे ते शोधून तपास करायचा आहे. आरोपी लपून बसण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. “गुन्ह्यातील कार पोलिसांनी जप्त केलेली आहे. कारने समोरून धडक दिली होती तेव्हाच गाडीची नंबरप्लेट तुटून खाली पडली होती. यांनी फक्त ती उचलून गाडीत ठेवली. मिहीरला काल दुपारी 3 वाजता अटक झाली, मेडिकल झालेलं आहे. तपास पूर्ण झालाय. आता पोलीस कोठडीची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. घटनास्थळावरही आरोपीला नेण्यात आलं आणि तपास करण्यात आला. आता अजून काय तपास करायचा शिल्लक आहे? आरोपीची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अटकेची माहिती राजेश शहा यांना देण्यात आली होती”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला.

आरोपीच्या वकिलांकडून सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न
“गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. तपास अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे. आम्हाला जास्तीत जास्त पोलीस कोठडीची आवश्यकता आहे”, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी पोलिसांना सवाल केले. “उद्या एका आरोपीची पोलीस कोठडी संपते आहे. त्यात तुम्ही प्रगती सांगा. तपासात काय निष्पन्न झालं ते सांगा आणि मग जास्त कोठडीची मागणी करा. मिहीरला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवा आणि उद्या तपासात काय प्रगती आहे ते सांगा”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

अखेर आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
“अतिशय निर्घृणपणे त्या महिलेचा अपघात झालाय”, असं सरकारी वकील म्हणाले. त्यावर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. “मी दाढी आणि केस कापले हा पोलीस कोठडी मागण्याचा मार्ग असू शकतं नाही”, असं आरोपीचे वकील म्हणाले. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी मिहीर शाह याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button