सिद्धार्थ चांदेकरच्या घरी अभिज्ञा भावेचं केळवण
मुंबई – अभिनेत्री अभिज्ञा भावे नवीन वर्षात लग्नगाठ बांधणार असून आता तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या तयारीची सुरुवात होते केळवणाच्या कार्यक्रमापासून. अभिज्ञा आणि तिचा होणारा पती मेहुल पै या दोघांचे केळवण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची होणारी पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर यांनी मोठ्या उत्साहात केले. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या केळवणाचे फोटो पोस्ट केले आहेत.
खरंतर लग्नाआधी वधू-वरासाठी केले जाणारे केळवण हे सर्वांनी एकत्र भेटण्याचे निमित्त असते. यावेळी वधू-वराला जेवणासाठी आमंत्रित करून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. तसेच एखादी भेटवस्तू देऊन त्यांना लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात.
दरम्यान, अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न असून ऑगस्ट महिन्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात दोघे लग्नगाठ बांधणार आहेत. २०१४ साली अभिज्ञाचं वरुण वैटिकरसोबत लग्न झालं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर आता अभिज्ञा नव्या नात्याला सुरुवात करत आहे. महत्त्वाचे म्हणजे मेहुल आणि अभिज्ञा एकाच कॉलेजमध्ये होते आणि दोघे एकमेकांना गेल्या पंधरा वर्षांपासून ओळखतात.