रिडले स्कॉट बनवणार “ग्लॅडिएटर’चा सिक्वेल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Gladiator-.jpg)
18 वर्षांपूर्वी हॉलीवूडमध्ये गाजलेल्या आणि 5 ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या “ग्लॅडिएटर’चा सिक्वेल लवकरच बनवला जाणार आहे. हॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता रिडली स्कॉट यांनी या सिक्वेलची जबाबदारी उचलली आहे. मूळ “ग्लॅडिएटर’मध्ये रसेल क्रो याने मुख्य योद्ध्याची भूमिका केली होती. त्याच्यासमवेत जोआक्वीन फिनिक्स आणि कोणी निल्सन हे देखील लीड रोलमध्ये होते.
अतिप्राचीन काळी राजाच्या मनोरंजनासाठी लढाईचे खेळ खेळले जायचे. त्यामध्ये गुलामांना उतरवले जायचे. भयंकर श्वापदांचाही वापर सर्रास व्हायचा. त्या क्रूर खेळूातून जिवंत वाचून अखेर क्रूर राजाचा अंत करणाऱ्या योद्ध्याचा रोल रसेल क्रो याने संस्मरणीय केला होता. बॉक्स ऑफिसवर या मूळ सिनेमाने तब्बल 450 दशलक्ष डॉलरचा धंदा केला होता. हे उत्पन्नाचे रेकॉर्ड 2015 मध्ये “द मार्टियन’कडून मोडले गेले होते. या कथेचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. आता मूळ कथा जिथे संपते तेथूनच नवीन सिनेमाची कथा सुरू करण्याचा विचार निर्मात्यांकडून केला जातो आहे. राजा कमांडसची बहीण ल्युसिलाचा मुलगा ल्युसियस मोठा झालेला यामध्ये दिसणार आहे. त्याच्या पूर्वाश्रमी जे काही झाले होते, त्याचे ज्ञान त्याला मोठेपणी झालेले असेल. तेथूनच ही कथा उलगडत जाईल.
या सिक्वेलची कथा लिहीण्याची जबाबदारी पीटर ग्रेगवर आहे. पीटर ग्रेग यांनी “हंगर गेम्स : मॉकिंग्जे 1 आणि 2’ची कथा लिहिली होती. आता पुन्हा एकदा तशीच अॅक्शनपॅक्ड थीम डेव्हलप करण्याचे मोठे आव्हान ग्रेग यांच्यावर आले आहे. हॉलिवूडमध्ये “टर्मिनेटर’, “ज्युरासिक पार्क’ आणि “रॅम्बो’ सारख्या सिनेमांच्या कथा एकामधून दुसऱ्या सिनेमात उलगडत गेल्याची उदाहरणे फारच तुरळकपणे आढळतात. काही वेळा हॅरी पॉटरच्या सिनेमामध्ये एका सिनेमातील संदर्भ दुसऱ्या सिनेमात आढळतातही. मात्र पूर्ण पहिल्या सिनेमाच्या कथेतूनच दुसऱ्या सिनेमाची कथा निर्माण होणे असे “बाहुबली’सारखे प्रयोग फारच क्वचित होतात. त्यातही 18 वर्षांनंतर असा प्रयोग प्रेक्षकांना किती आवडेल हे सांगता येऊ शकत नाही.