दहा वर्षांच्या कमलीचं स्केटबोर्डवरील थक्क करणारं कौशल्य…लघुपटाला BAFTA पुरस्काराचे नामांकन…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-44.png)
तामिळनाडूमधील कमली मुर्ती ही दहा वर्षांची मुलगी काही वर्षांपूर्वी देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरली. या चर्चेमागील कारण म्हणजे लहान गावातून आलेल्या या मुलीचे स्केटबोर्डवरील कौशल्य. या मुलीची इतकी चर्चा झाली की अमेरिकेतील लोकप्रिय स्केटबोर्ड खेळाडू टोनी हॅवॅकनेही तिचा फोटो शेअर केला होता. “माझा नवा आवडता स्केटबोर्ड फोटो,” अशी कॅप्शन टोनीने या फोटोला दिली होती.
कमलीला केवळ तिच्या आईनेच लहानाचे मोठे केले. मासे विक्री करणाऱ्या आईने पोटाला चिमटा काढून मुलीचे पालनपोषण तर केलेच शिवाय तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झटत आहे. कमलीला जगविख्यात स्केटबोर्ड चॅम्पीयन व्हायचे आहे. तिची हिच जिद्द पाहून तिच्या जीवनप्रवासावर ‘कमली’ हा लघुपट तयार करण्यात आला. २४ मिनिटांच्या या लघूपटाला आता ब्रिटनमधील ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स २०२० मध्ये ब्रिटीश बेस्ट डॉक्युमेंन्ट्री प्रकारामध्ये नामांकन मिळाले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1-12.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/km.png)
ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स २०२० हा सोहळा दोन फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. यामध्ये अनेक भन्नाट लघुपट दाखवण्यात येणार आहे. ‘लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉर झोन’ नावाचा लघुपटही या पुरस्कार सोहळ्यात दाखवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानमध्ये एक मुलगी शिक्षण घेण्याबरोबरच स्केटबोर्ड कसा शिकते याबद्दलचा हा लघुपट आहे.
टोनी हॅवॅकने कमलीचा फोटो शेअर केल्यानंतर तिच्याबद्दल जगभरात चर्चा झाली. महाबलीपुरम येथे भटकंतीसाठी आलेल्या जीमी थॉम्सनने हा फोटो काढला आहे. जीमी स्वत: एक उत्तम स्केटबोर्डपटू आहे. तसेच तो एक उत्तम फोटोग्राफरही आहे. त्याने टीपलेला हा फोटो टोनीला खूपच आवडल्याने तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
‘कमली’ हा लघुपट न्यूझिलंडमधील साशा रेनबो यांनी दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला २०१८ साली मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट मोहोत्सवामध्ये सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मिळाला होता. अटलांटा चित्रपट मोहोत्सवामध्येही या लघुपटाचे बरेच कौतुक झालं.आता या लघुपटाला पुरस्कार मिळतो की नाही हे येत्या दोन फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.