”तुला पाहते रे’ महाराष्ट्रासाठी घातक, मालिका बंद करा’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/TPR.jpg)
झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे. या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला आहे.
‘या मालिकेत २० वर्षांची मुलगी ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई- मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील २० वर्षीय मुलीचे लग्न ४० वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी,’ असं प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटलं आहे.
या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. सुबोध विक्रांत सरंजामे या श्रीमंत व्यावसायिकाची तर गायत्री ईशा निमकर या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणीची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली असून टीआरपीच्या यादीतही आघाडीवर आहे.