निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल, मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8 दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र अनेकांनी या निकालानंतर ईव्हीएमववर आक्षेप घेतला. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदान क्षेत्रात दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच मनसेचे राजू पाटील यांनीही पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार का, अशी चर्चा रंगली आहे.
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या या निकालाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. दोन माजी आमदार, मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाचे राजेश मोरे यांचा या निवडणुकीत विजय झाला. या धक्कादायक विजयामुळे मतदारसंघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, ठाकरे गटाचे सुभाष भोईर आणि मनसेचे राजू पाटील यांनी या निकालाला आव्हान दिले आहे. या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही माजी आमदारांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्यासाठी अर्ज केला आहे. राजू पाटील यांनी 22 तर सुभाष भोईर यांनी 5 व्हीव्हीपॅट यंत्रांची मते मोजण्याची मागणी केली आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा खर्चही त्यांनी भरला आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जोरदार लढत होईल, असे भाकीत वर्तवण्यात येत होते. मात्र, राजेश मोरे यांनी बाजी मारल्याने अनेक मतदार आणि राजकीय तज्ज्ञ चकित झाले. यावरून सोशल मीडियासह इतर व्यासपीठांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.