‘तांडव’विरोधात राम कदम यांची पोलीस तक्रार; निर्माता, दिग्दर्शकावर कारवाई करण्याची मागणी
![Ram Kadam's police complaint against 'Tandav'; Demand for action against producer, director](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/ram-kadam-tandav-web.jpg)
मुंबई – तांडव या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केला असल्याचा आरोप करत भाजपाचे आमदार राम कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात ‘तांडव’ वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या वेबसीरिजचा निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कदम यांनी केली आहे.
राम कदम यांनी सकाळी यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, “चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का केला जातो. अलिकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन वेब सीरिज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सीरिजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत”
अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी ‘तांडव’ ही वेबसीरीज रिलीज झाली. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यामध्ये प्रमुख भुमिकेत असून अली अब्बास यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ही वेबसीरीज प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तांडवचे डायलॉग आणि काही सीन्सवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये भगवान शिवशंकर आणि श्रीराम यांच्यावर टिपण्णी करण्यात आली आहे.