TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील एक लाखाहून अधिक तरुणांना रोजगाराची संधी; विविध उद्योजक, संस्थांशी सरकारचा सामंजस्य करार

मुंबई: राज्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने बुधवारी विविध ४४ नामांकीत उद्योजक, कॉर्पोरेट संस्था, औद्योगिक संघटना यांच्यासमवेत सामंजस्य करार केले. त्यामुळे सुमारे १ लाख २१ हजार युवक, युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उद्योगांनी आता त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचे स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ सुलभतेने मिळू शकेल, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह उद्योजक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

चालू आर्थिक वर्षांत राज्य शासनाने राज्यातील ५ लाख बेरोजगार युवक, युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार मेळाव्यामार्फत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. यासाठी औद्योगिक आस्थापना, रोजगार संस्था यांच्यासमवेत वेळोवेळी समन्वय साधणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने भविष्यातील रोजगार मेळाव्यांचे प्रभावीपणे आयोजन होण्यासाठी आज हे सामंजस्य करार करण्यात आले. या कराराद्वारे राज्यातील बेरोजगार युवक, युवतींसाठी आदरातिथ्य , प्रसारमाध्यम, बांधकाम, रिटेल, बँकींग आदी विविध क्षेत्रामध्ये पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना रोजगाराची उपलब्धता व्हावी यासाठी कौशल्य विकास विभागाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. उद्योजकांनी या कामात सहभाग घेऊन आज झालेल्या सामंजस्य करारांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी असे आवाहन कोश्यारी यांनी केले.

नोकऱ्या देणारे हात निर्माण करु या – मुख्यमंत्री

नोकऱ्या घेणाऱ्यांबरोबरच नोकऱ्या देणारे हात देखिल निर्माण करा, असे स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत. आजच्या कार्यक्रमातून १ लाख २१ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा संकल्प आपण केला आहे. नजिकच्या काळात राज्यात मोठे उद्योग येतील व त्याद्वारे राज्याच्या विकास प्रक्रियेला अजून गती प्राप्त होईल. राज्य शासन त्यादृष्टीने व्यापक काम करत असून प्रधानमंत्र्यांनीही यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात अनेक उद्योगांनी गुंतवणुक सुरु केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तर आजही राज्यातील ४५ टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती क्षेत्राला सेवाक्षेत्र व उत्पादन क्षेत्राशी जोडले गेले पाहिजे. त्यामुळे शेती क्षेत्रावरील २० टक्के रोजगाराचा भार कमी होईल. यामुळे शाश्वत विकासाकडे वाटचाल शक्य होईल असे फडणवीस यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध विभागांचा अभ्यास करून तरूणांना कौशल्य विषयक प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी येत्या वर्षभरमत एक हजार कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याद्वारे ग्रामीण युवकांना रोजगारासाठी शहरांमध्ये येण्याची गरज राहणार नाही. प्रत्येक सक्षम तरुणाला नोकरी मिळावी या अनुषंगाने कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button