शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ईडीने समन्स बजावल्याचे समजते. त्यानुसार, वायकर ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. मंगळवारी वायकर यांची ईडीकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे हा मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. वायकर यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी झाली, त्याबाबत अद्यापही समजू शकले नाही.
ईडीने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांची चौकशी केली आहे. त्यानंतर ईडीने आता आपला मोर्चा आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे वळवला आहे. वायकर यांना ईडीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समन्स बजावले. त्यानुसार वायकर काल ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल आठ तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. वायकर यांच्या चौकशीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांना नेमके कोणत्या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वायकर यांच्या चौकशीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे.
कोण आहेत रवींद्र वायकर?
आमदार रवींद्र वायकर हे १५ वर्षांपासून मंत्री आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थान यासह विविध सामाजिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये ते संचालक म्हणून कार्यरत आहेत.