breaking-newsमनोरंजन

जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगना घेते तमिळ भाषेचे धडे

उत्कृष्ट अभिनयशैली आणि तितक्याच ताकदीने भूमिकेला दिलेला न्याय यामुळे कंगाना रणौत बॉलिवूडची क्वीन ठरली आहे. कंगनाचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाच्या यशानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून आता ती लवकरच ‘जया’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कंगनाने जोरदार तयारी सुरु केली असून सध्या ती तामिळ भाषेचे धडे घेताना दिसत आहे.

‘जया’ हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरही बायोपिक आहे. हा बायोपिक हिंदी आणि तमिळ या दोन भाषांमध्ये चित्रीत होणार असल्याने कंगना तमिळ भाषेचे धडे घेत आहे.

‘मी या चित्रपटासाठी फार उत्साही आहे. जयललिता यांच्या आणि माझ्या आयुष्यातील बऱ्याच घटना सारख्याच आहेत. परंतु त्यांची भूमिका मला उत्तमरित्या पार पाडायची आहे. तसेच ती प्रेक्षकांना देखील खरी वाटावी यासाठी मी तमिळ भाषेचे धडे घेत आहे. मला नेहमी प्रादेशिक भाषांचे आकर्षण असल्यामुळे काम करायची इच्छा होती. माझ्या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान मी अनेक राज्य फिरले. तेव्हा मला जाणवले की प्रादेशिक चित्रपट काढणाऱ्यांकडे अतिशय सुंदर असा आशय असतो. मी एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहात होते आणि या चित्रपटात मला ती दिसली’ असे कंगना म्हणाली.

दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने तब्बल २४ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. जयललिता यांच्या बायोपिकचं हिंदीत ‘जया’ तर तेलुगुमध्ये ‘थलावयी’ असं नाव असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button