ताज्या घडामोडीमुंबई

निवृत्ती वेतन नियम! शेकडो पालिका कर्मचारी, कामगारांमध्ये नाराजी

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई महापालिकेत २००८नंतर भरती झालेल्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांसमोर निवृत्ती योजनेतील अपुऱ्या लाभांमुळे चिंता निर्माण झाली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना ५ मे, २००८ पूर्वी भरती झालेल्यांना तत्कालीन निवृत्त योजनेत मिळणारे लाभ २००८नंतर भरती झालेल्यांना मिळत नाहीत. त्यामुळे निवृत्तीनंतर अपुरे निवृत्ती वेतन, आरोग्यावरील खर्चांमुळे जगणे खडतर होण्याची भीती असताना पालिकेच्या सध्याच्या निवृत्ती योजनेविषयी शेकडो कर्मचारी, कामगारांमध्ये नाराजी आहे.

मुंबई पालिकेत ५ मे, २००८पूर्वी भरती झालेल्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना बृहन्मुंबई महापालिका निवृत्ती वेतन नियम १९५३नुसार जुनी पेन्शन योजना लागू आहे. त्यानंतर, २००८ नंतर भरती झालेल्या कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी नवीन निवृत्ती योजना लागू केली आहे. त्याबाबत, मुंबई पालिकेने ५ मे २००८ रोजी ठराव मंजूर करत राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेतील कर्मचाऱ्यांना नवीन अंशदान निवृत्त योजना लागू केली आहे. मात्र, या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास निवृत्त योजनेतील तपशील, मासिक निवृत्त रक्कम याबाबत काहीही नमूद केले नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांनी नोंदविला आहे. तसेच या योजनेंतर्गत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसह जोडण्यात येणार होते. पण, ते अद्याप जोडण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे, पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त योजनेविषयी निर्णय घेत पालिकेने स्वतःची योजना सुरू केली नसल्याकडे दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी नमूद केले आहे.

कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीचा फायदा नाकारण्यात आल्याचा आक्षेपही कामगार संघटनांनी घेतला आहे. आतापर्यंत, त्या योजनेत समाविष्ट असलेल्या आणि आतापर्यंत ४००हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबीयांना पालिकेने अजूनही ग्रॅच्युईटी, निवृत्ती वेतन दिलेले नसल्याचे कामगार संघटनांनी नमूद केले आहे.

मुंबई पालिकेत ५ मे, २००८नंतर सुमारे ५० हजारहून अधिक कामगार, कर्मचारी, अधिकारी भरती झाले असून त्या सर्वांनाच निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता सतावत आहे. देशभरात दिल्ली, राजस्थान, छत्तीसगढमध्ये राज्य सरकारांनी नवीन निवृत्ती योजना रद्द केली असून तिथे जुनी निवृत्ती योजना लागू केली आहे. त्यामुळे, तीन राज्यापाठोपाठ महाराष्ट्रातही जुनी निवृत्त योजना लागू करण्याची मागणी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस रवींद्र सूर्यवंशी, सचिव अमित खरात यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र

पालिका कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पत्रही पाठविण्यात आले आहे. पालिका कर्मचारी, कामगार, अधिकाऱ्यांना बृहन्मुंबई महापालिका निवृत्ती वेतन नियम १९५३ प्रमाणे जुनी सेवानिवृत्ती योजना, ग्रॅच्युईटी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची आग्रही मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button