breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

महायुती की महाविकास आघाडी चिंचवडमध्ये ‘वंचित’ कोणाची?

डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाकडे लक्ष : राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवारांकडून विनंती


पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मिळावा. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ‘वंचित’कडे विनंती अर्ज पाठवला आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा सुमारे ३० हजार निर्णायक मतांचा गठ्ठा चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहे. त्यावर अपक्षांसह प्रमुख पक्षांचा डोळा आहे.


काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. त्यामुळे वंचित शिवसेनेसोबत आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये अद्याप वंचित सहभागी झालेली नाही. त्यामुळे डॉ. प्रकाश आंबेडकर कसबा आणि चिंचवड मतदार संघात काय भूमिका घेणार? याकडे चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व अलबेल आहे, असे नाही. तीन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले होते. ‘‘अजित पवार बंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास तयार आहेत. मात्र, त्यांनी हे माझे व्यक्तिगत मत आहे. माझ्या पक्षाचे तसे मत नाही, असे सांगितलेले आहे. माझ्या पक्षाला वंचित चालत नाही. मात्र मला चालते, असे अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले,” असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते. याचाच अर्थ वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीत सहभागी झालेली नाही किंवा होईल असे वाटत नाही.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, तर महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या दृष्टीने पहिले सकारात्मक पाऊल असेल. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीविरोधातील राग काढण्याची भूमिका वंचितने घेतल्यास किमान १५ ते २० हजार मतांचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.
राहुल कलाटेंना मदत अशक्य…
महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा द्यावा, असे पत्र डॉ. प्रकाश आंबेडकर यांना पाठवले आहे. मात्र, राहुल कलाटे महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र इच्छुक होते. कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या मतांचे विभाजन होईल, असे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासोबत बंडखोरी केलेल्या उमेदवाराला वंचित आघाडी पाठिंबा देणार नाही. याउलट, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेतली जाईल किंवा तटस्थ राहण्याचा निर्णय डॉ. प्रकाश आंबेडकर घेतील, असा दावा केला जात आहे.
त्यातच आता चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील नेहमीच प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम उभी राहिली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिगामी शक्तींना नामोहरण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा द्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button