breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका!, सरसंघचालक मोहन भागवत यांनी टोचले कान

नागपूर : ‘ज्ञानव्यापीशी हिंदूंच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. मात्र, याचा अर्थ प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये! आम्ही म्हणू तेच खरे आहे, असा कट्टरतावाद तसेच अहंकार कुणीही बाळगू नये. ही भारतभूमी सर्वांना सामावून घेणारी आहे. कुणालाही न बदलविणारी, प्रत्येकाच्या पूजापद्धतीचा सन्मान राखणारी आपली परंपरा आहे. या परंपरेला अनुरूप असेच हिंदूंनी स्वतःचे आचरण ठेवावे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर झाला; याप्रसंगी सरसंघचालक भागवत बोलत होते. श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष कमलेश पटेल उर्फ दाजी हे प्रमुख अतिथी होते. ‘ज्ञानव्यापी’च्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम संबंधांवर प्रकाश टाकताना सरसंघचालक म्हणाले, ‘देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्यलढ्यात हिंदूंसोबत राष्ट्रीय वृत्तीचे मुस्लिम लढले आहेत. अश्फाकउल्ला खान, इब्राहिम खान गारदी हे येथील मुस्लिमांसाठी आदर्श आहेत. त्यांचा संबंध भारताशी आहे, बाहेरील राष्ट्रांशी नाही. मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून स्वीकारली आहे, येथील सर्वसमावेशक भारतीय संस्कृती स्वीकारली आहे. फाळणी झाली तेव्हा आपली पूजा पद्धती वेगळी आहे म्हणून आपण पाकिस्तानात जावे, असे न वाटल्यामुळेच मुस्लिम येथे थांबले. अशा या भारतासोबत समरस होऊन राहायला हवे. वेगळेपणाचा राग पुन्हा आळवू नये’.

केंद्राच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक

‘रशियाने युक्रेनवर हल्ला करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. ही स्थिती थांबविण्यासाठी एकही शक्तिशाली देश पुढे येताना दिसत नाही. चीनसारखा बलाढ्य देश हे युद्ध थांबवू शकलेला नाही. अमेरिकासारखे देश शस्त्रपुरवठा करून स्थिती चिघळवत आहेत. भारत पूर्णतः शक्तिशाली देश असता तर हे युद्ध झाले नसते. आजघडीला भारत एकीकडे रशियाला शांततापूर्ण मार्गाने समस्या सोडविण्यास सांगत असताना दुसरीकडे युक्रेनला शस्त्र पुरवठा वगळता सर्वतोपरी मदत करत आहे. भारताने अतिशय संतुलित भूमिका घेतली आहे’, असे म्हणत सरसंघचालकांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले.

कमलेश पटेल उर्फ दाजी म्हणाले, ‘विश्वगुरू होण्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही क्षेत्रांत भारताला आघाडी घ्यावी लागेल. आपण सर्व एक आहोत हा भाव निर्माण व्हायला हवा.’ कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, सर्वाधिकारी अशोक पांडे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, अझीम प्रेमजी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग बेहर, अर्थतज्ज्ञ संजीव संन्याल, लेखिका स्मिता संन्याल, संघाचे अखिल भारतीय सहबौद्धिकप्रमुख सुनील मेहता, सुचिता मेहता, सामाजिक कार्यकर्त्या कामाक्षी अक्का, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, बंजारा समाजाचे धर्मगुरूंची उपस्थिती होती. याप्रसंगी ध्वजप्रणाम, शारीरिक कवायती, सांघिक गीत, एकल गीत झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button