breaking-newsताज्या घडामोडी

पवित्र गोदावरीत डुबकी मारताय? त्या आधी हे धक्कादायक वास्तव एकदा वाचाच

  • मनपा आयुक्तांच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

नाशिकः गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी ५० ठिकाणी सांडपाण्याचे पाइप सोडण्यात आले असून, त्यापैकी १० पाइपमधील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी (दि. १) महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या पाहणी दौऱ्यात समोर आले आहे. गटारींचे हे पाइप तातडीने बंद करून भूमिगत गटारींना जोडण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले आहेत.

गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीची मोहीम आयुक्त पवार यांनी हाती घेतली आहे. यासाठी पवार यांनी बुधवारी (दि. १) अहिल्यादेवी होळकर पूल ते जलालपूर, गोवर्धन मनपा हद्दीपर्यंत बोटीने, पायी व वाहनाद्वारे पाहणी केली. सकाळी साडेसात वाजेपासूनच आयुक्त महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौऱ्याला निघाले होते. या पाहणीवेळी सुमारे ५० ठिकाणी सांडपाण्याचे पाइप नदीत सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. पन्नासपैकी ४० पाइप कोरडे, तर १० पाइपमधून मलजल नदीत मिश्रित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त पवार यांनी दिले आहेत.

गंगापूर मलजल शुध्दीकरण केंद्रातील प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुनर्वापर शेतीसाठी तसेच औद्योगिक कामांसाठी आणि उद्यानांमधील झाडांकरिता पुरविण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्याच्या सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, अग्निशमन दल प्रमुख एस. के. बैरागी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, उपअभियंता नितीन राजपूत, संजय आडेसरा, स्मार्ट सिटी विभागाचे कानडे आदी उपस्थित होते.

आयुक्तांचे निर्देश

– परीचा बाग येथील पावसाळी नाल्यातील ड्रेनेजचे पाणी बंद करणे

– लेंडी नाल्यातील मलजल स्मार्ट सिटीच्या ९०० मीटर व्यासाच्या मलनिस्सारण वाहिनीत वळविणे

– साळुंखे क्लासेस येथील मलजल रामवाडीच्या मुख्य रस्त्यावरील मलवाहिकेस जोडणे

– मल्हार खान येथील मलजल गोदावरी नदीच्या उजवीकडील मलनिस्सारण वाहिनीस जोडणे

– चोपडा नाला ब्रिजच्या दोन्ही बाजूचे मलजल हे पंपिंग स्टेशनमधील मलजल उपसा केंद्रात वळविणे

– जुन्या पंपिंग स्टेशनपासून गोदावरी नदीवरील ब्रिजवरून जाणारी रायझिंग मेन पुढे तपोवन मलजल शुद्धीकरण केंद्रापर्यंत टाकणे.

– आसारामबापू पुलाजवळील सांडपाणी, लगतच्या २४ मीटर डी. पी. रस्त्यालगत नवीन ड्रेनेज लाइन टाकून त्यास जोडणे

– चिखली नाल्यातील एमआयडीसीचे व मलजलचे पाणी, जवळील मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर दुरुस्ती करून त्यात वळविणे

– आनंदवली नाल्याचे ड्रेनेजचे पाणी पंपिंग करून जवळील मलनिस्सारण वाहिनीत टाकणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button