ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीसांकडे

अहमदनगर | आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षानं मिशन २०२४ सुरू केलं आहे. त्यासाठी पक्षाच्या चौदा प्रमुख नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारी वाटप करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. सध्या लोकसभेला नगरची एक जागा भाजपकडं आणि दुसरी शिवसेनेकडं आहे. मात्र, विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं ) प्राबल्य आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्याकडं नगरची जबाबदारी दिली जाणे महत्वाचं मानलं जात आहे.

भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये हे मिशन २०२४ ठरविण्यात आलं आहे. त्यासाठी प्रत्येक प्रमुख नेत्याकडं लोकसभेच्या दोन मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानुसार फडणवीस यांच्याकडं नगर आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे. आगामी निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. मतदार संघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी ही कामं सुरू होणार आहेत. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होणार आहेत. यासाठी संबंधित नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यांत दौरे करणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत ते दौरे सुरू होणार आहेत.

जिल्ह्यांचे वाटप करताना पक्षानं नेते ज्या भागातील आहेत, त्या भागातील जिल्हे न देता दुसरीकडील जिल्हे त्यांना देण्यात आले आहेत. राज्याच्या राजकारणासाठी नगर जिल्हा महत्वाचा आहे. त्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे आली आहे. राष्ट्रवादीकडून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगरवर विशेष लक्ष ठेवून असतात. नगर जिल्ह्यात सध्या महाविकास आघाडीचे तीन मंत्री आहेत. नगर लोकसभा भाजपकडं तर शिर्डी शिवसेनेकडं आहे. मात्र, विधानसभेत राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. नगरची लोकसभेची जागा भाजपकडून म्हणजेच डॉ. सुजय विखे यांच्याकडून काढून ते राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचं नाव राष्ट्रवादीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पुढं आलं आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेतेही लंकेही यांना वेळोवेळी पाठबळ देताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरही विखे विरूद्ध लंके असा संघर्ष आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील पकड मजबूत केली आहे. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन राष्ट्रवादीनं त्यांना बळ दिलं आहे. राज्यमंत्री तनपुरे यांच्यावर ईडीनं अलीकडंच कारवाई केली, मात्र त्याचा फारसा परिणाम झाल्याचं पक्षातून दिसून आलं नाही. उलट त्यांच्याकडं गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊन त्यांचेही महत्व वाढविण्यात आलं. दुसरीकडं जिल्ह्यात सध्या जेथे भाजपचे आमदार आहेत, तेथे राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांना ताकद देण्यास पक्षाने सुरूवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपनं नगरची जबाबदारी फडणवीस यांच्याकडं सोपविली आहे. भाजपमधील अंतर्गत मतभेद दूर करून सर्वांना एकत्र आणण्याचं काम करताना राष्ट्रवादीची घौडदौड रोखण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडं असेल, असं यावरून दिसून येतं. फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ आणि शक्तीशाली नेत्याकडं नगरची जबाबदारी सोपविल्यानं आणि अन्य राज्यांच्या निवडणुकांत जेथे त्यांच्याकडं जबबादारी सोपविली तेथील निकाल लक्षात घेता नगर जिल्ह्यातील आगामी काळात नगर जिल्ह्यात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी संघर्ष तीव्र होणार असल्याची चिन्हं आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button