TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गोखले पुलाचे पाडकाम रेल्वेकडूनच; पालिका-रेल्वे बैठक निष्फळ ठरल्यानंतर मंत्रालयातील बैठकीत निर्णय

मुंबई :  अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाच्या रेल्वेमार्गावरील भागाचे पाडकाम कोण करणार, यावरून मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. या पुलाचे पाडकाम रेल्वे करेल, अशी माहिती मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अंधेरीतील गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी या पुलाच्या कामाचे घोडे पाडकामातच अडकले आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा भाग रेल्वेनेच तोडावा, असा पालिकेचा आग्रह आहे तर, रेल्वेला या प्रक्रियेसाठी सात-आठ महिने लागतील, असे रेल्वेचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यात एकमत होऊ शकले नाही.

दरम्यान, पुलासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत पुलाचे पाडकाम रेल्वे करणार असल्याची माहिती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘पुलाचे पाडकाम ३ ते ४ महिन्यांत रेल्वेकडून करण्यात येईल. मुंबई महापालिका पुलाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू करेल. मे २०२३ अखेपर्यंत पुलाची किमान एक मार्गिका सुरू करण्याचा मानस आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या पुलासंदर्भात रेल्वेकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे,’ असेही ते म्हणाले. या बैठकीला आमदार अमित साटम, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

पर्यायी रस्ते सपाट

गोखले पूल बंद झाल्यामुळे वाहतुकीचा पेच निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पर्यायी रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणचे काम महापालिकेने पूर्ण केले.  त्यासाठी अतिरिक्त यंत्रणा नेमून व रात्रीच्या वेळी ठरवून दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये वांद्रे ते जोगेश्वरीचा पूर्व भाग, गोरेगावपर्यंतचे सर्व रस्ते व्यवस्थित करण्यात आले. गोखले पूल ते महामार्ग व पुढे सहार रोड, अंधेरी स्थानक, तेली गल्ली यांना जोडणाऱ्या एन. एस. फडके मार्गावरही महत्त्वाच्या ठिकाणांवर पुनर्पृष्ठीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्यांवरून फेरीवाले हटवण्याच्या मोहिमेलाही पालिकेने गुरुवारपासून सुरुवात केली.

नवीन पुलाचे संकल्पचित्र तयार

गोखले पुलाच्या संकल्पचित्राच्या आराखडय़ावर मुंबई आयआयटीने शिक्कामोर्तब केले असून पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निविदेचा मसुदा तयार झाला असून शनिवारी या पूलाच्या कामासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस कंत्राटदार निश्चित होणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पुलाच्या कामाचा कार्यादेश देण्यात येतील, अशी माहिती  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button