breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

#Decision Maker पार्थ पवार : विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष निवडीद्वारे राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वाला सूचक इशारा

  • पिंपरी-चिंचवडसह मावळमध्ये पार्थ पवारांचे विशेष लक्ष
  • विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष निवडीमध्ये घेतली निर्णायक भूमिका

पिंपरी | महाईन्यूज | अमोल शित्रे

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पार्टीमध्ये संघटनात्मक बदल होत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्यावर थेट विद्यार्थी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ही निवड शहरातील स्थानिक पुढा-यांना सूचक संदेश देणारी आहे. कारण, गव्हाणे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. या निवडीवरून राष्ट्रवादीत ”मी म्हणेल त्यालाच पदे !”, ”मी सांगेल तोच निर्णय अंतिम !” अशा मानसिकतेला एकप्रकारे धक्का पोहोचला आहे. तरी, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी निवड प्रक्रियेत पार्थ यांची भूमिका निर्णायक मानली जाते, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंगेस पार्टीबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अजित पवार यांच्या परवानगीशिवाय पानही हालत नाही. अशी वस्तुस्थिती होती. परंतु, 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी शहरातील लक्ष कमी केले होते. कारण, राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव राहिला नाही. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला होता. काही नेत्यांनी पार्थ पवार यांचे नेतृत्व मान्य केले नाही. कारण, पूर्वी शरद पवार त्यानंतर अजित पवार आणि आता पार्थ पवार यांच्या सचनांनुसार वागायचे का ?, अशी नकारात्मक मानसिकता राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्यात आली. परिणामी राष्ट्रवादीतील मोठी फळी पार्थ पवार यांच्या नेतृत्वाला छुप्या पध्दतीने विरोध करत होती. अशा झारीतील शुक्राचार्यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सूचक इशारा दिला आहे. यापुढील काळात चिंचवडसह मावळमध्ये पक्षाच्या कोणत्याही निर्णयामध्ये पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आह, यात तिळमात्र शंका नाही. गव्हाणे यांच्या निवडीने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सुनिल गव्हाणे यांनी आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर अजित पवार यांच्या मनात स्थान निर्माण केले. पुढे त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. गव्हाणे यांनी ही जबाबदारी अत्यंत कौशल्याने पेलली. त्यांनी विद्यार्थी दशेतील युवकांचे, तरुणांचे शालेय- महाविद्यालयीन प्रश्न व समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले. अत्यंत साधी राहणी आणि प्रत्येक क्षेत्राच्या मुळाशी जाण्याचा मुत्सद्दीपणा असल्यामुळे त्यांची समोरच्या व्यक्तीवर छाप पडल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यातला हा नेमकेपणा हेरून त्यांच्यावर पक्षाने आता राज्य पातळीवरील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

कर्तव्यशून्य पदाधिका-यांमुळे पक्षाला पदोपदी अपयश

सुनिल गव्हाणे हे पक्षातील नवखा आणि तरुण चेहरा असुनही त्यांची प्रदेश पातळीवर निवड झाल्याने पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षनेतृत्वाकडे सारखा ‘रडीचा डाव आणि तेच ते रडगाणे’ गाणा-यांना यापुढे पक्षात काडीचे स्थान नसल्याचा संदेश यातून गेला आहे. कारण, जुन्या आणि स्वतःला मातब्बर समजणा-या पदाधिका-यांनी आजपर्यंत दादांच्या पुढेमागे करण्याशिवाय काहीच केले नाही. पक्ष संघटनासाठी त्यांचा काडीचा आधार नाही. अशा कर्तव्यशून्य पदाधिका-यांमुळेच पक्षाला पदोपदी अपयशाचा सामना करावा लागला, हे पक्षनेतृत्वाला कळून चुकले आहे. यातून सावरण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आता ”पार्थपर्व” सुरू झाल्याची प्रचिती येत आहे.

नवीन चेह-यांना संधी तर जुन्यांना बाहेरचा रस्ता

महापालिकेत सत्ता भाजपची आणि ठेकेदार राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. या पदाधिका-यांनी आपला जावई, मेव्हणा, भाच्चा, पुतन्या अशांना ठेकेदाराच्या रांगेत उभे केले आहे. त्यांच्या माध्यमातून भाजप पदाधिका-यांशी सेंटीग करून कोट्यवधी रुपयांची कामे घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची पक्षामध्ये मोठी पंचाईत झाली आहे. भाजपच्या विरोधात बोलावे तर कामाचा ठेका मिळत नाही, आंदोलन करावे तर केलेल्या कामाचे बिल निघत नाही, अशा धुमश्चक्रीत अडकल्यामुळे ”तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी भूमिका पदाधिका-यांनी घेतली आहे. ही बाब पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने अतिशय गांभिर्याने घेतली आहे. त्यामुळेच जुन्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याचे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button