breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीला उसणे अवसान, भाजपालाच सोनेरी दिवस : माजी सभागृह नेते एकनाथ पवार

  •  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चेला पूर्णविराम
  •  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत १००पेक्षा जास्त जागा जिंकणार

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता २०१७ मध्ये गेल्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते उसणे अवसान आणत आहेत. मात्र, देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे भाजपाला सोनेरी दिवस आहेत. त्यामुळे आमच्या १०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा दावा माजी सभागृहनेते तथा नगरसेवक एकनाथ पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरूवारी पिंपरी-चिंचवड दौरा केला. यादरम्यान, काही कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटनही केले. तसेच, खडसे यांनी भाजपाचे माजी सभागृह नेते एकनाथ पवार आणि विद्यमान सभागृह नेते नामदेव ढाके यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. यावर, संबंधित फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला भगदाड पडून राष्ट्रवादीला ताकद मिळणार आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे.

याबाबत बोलताना एकनाथ पवार म्हणाले की, एकनाथ खडसे पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते आहेत. गेल्या ३० वर्षांपासून आम्ही भाजपाच्या पक्ष संघटनेत काम करीत आहे. त्यामुळे खडसे यांच्यासोबत कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. आज खडसे राष्ट्रवादीत असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला निश्चितपणाने सोनेरी दिवस आहेत. त्यामुळे खडसे यांनी पुन्हा भाजपात यावे, अशी विनंतीही आम्ही त्यांना केली. विशेष म्हणजे, खडसे माझ्या घरी भेट देणार आहेत, ही बाब मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कितीही उकळ्या फुटत असल्या, तरी त्यांचा भ्रमनिरास होईल, असेही पवार यांनी म्हटले आहे.

  • राष्ट्रवादीला भ्रमाचा भोपळा…

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग कसेही होवोत. भाजपाकडे प्रत्येक प्रभागात प्रभावी उमेदवार आहेत. भाजपाकडून ज्यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट घ्यावे लागेल. त्यामुळे २०-२२ नगरसेवक भाजपातून बाहेर पडतील, हा राष्ट्रवादीचा दावा खोटा ठरणार आहे. उलट, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत. गेली ३० वर्षे शहरात भाजपाची मूल्ये रुजवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे आम्ही पक्षासोबत आहोत, राष्ट्रवादीने आपले नगरसेवक सांभाळावेत, असा इशाराही एकनाथ पवार यांनी दिला आहे.

  • राष्ट्रवादीने केवळ स्वप्ने पहावीत : सभागृहनेते नामदेव ढाके

आम्ही भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध निश्चितपणाने आहेत. त्याची भेट हा कौटुंबिक विषय आहे. मात्र, राष्ट्रवादीला भाजपाला खिंडार पडणार आहे, अशी स्वप्ने पडत आहेत. परंतु, राष्ट्रवादीकडे अनेक प्रभागांमध्ये उमेदवार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपातून बाहेर पडणाऱ्यांची प्रतीक्षा करीत उत्सव निश्चित साजरा करावा. तसा रोज कार्यक्रम करावा, त्याला आमचा आक्षेप नाही. पण, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दोन्ही आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार आहे, असा दावा सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button