breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सावंतांच्या निष्ठेवर ‘मातोश्री’ची मोहोर!

मुंबई : खासदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात संसदेतील कामगिरीची छाप पाडत मिळवलेला उत्कृष्ट संसदपटुत्वाचा पुरस्कार, कामगार संघटनेच्या नेतृत्वाच्या निमित्ताने एमटीएनएलसारख्या केंद्र सरकारी खात्याचा दांडगा अनुभव, हिंदी-इंग्रजी भाषांची जाण व मातोश्रीचे निष्ठावंत असलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई गटाशी असलेली जवळीक हे घटक अरविंद सावंत यांची शिवसेनेच्या कोटय़ातून मंत्रिपदासाठी निवड होण्यात महत्त्वाचे ठरले आहेत.

शिवसेनेच्या एकाच खासदारला मंत्रिपदाची संधी मिळणार असताना अरविंद सावंत यांची निवड झाली. अरविंद सावंत यांची ओळख निष्ठावंत अशी आहे. एमटीएनएलमधील कामगार संघटना, संपर्क प्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. विधान परिषदेतील आमदारकीच्या काळात विषयाचा अभ्यास करून नेमकी व प्रभावी भूमिका मांडणारे आमदार अशी ओळख त्यांनी मिळवली होती. २०१४ मधील विजयानंतर खासदार झाल्यावर अरविंद सावंत यांनी संसदेतही विविध विषयांवर अभ्यासू भाषणे करत छाप पाडली. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांनी मिळवला. याचबरोबर संसदेच्या विविध समित्यांचेही ते सदस्य होते. संसदीय कामातील आपले कसब यातून सावंत यांनी सिद्ध केले. मराठीबरोबरच हिंदी व इंग्रजी भाषांचीही त्यांना जाण आहे. एमटीएनएलमधील कामगार संघटनेचे नेतृत्व करताना केंद्र सरकारच्या विभागाची कामकाज पद्धती, अधिकारी-कर्मचाऱ्यांची मानसिकता यांचा दांडगा अनुभव सावंत यांना मिळाला आहे. त्यामुळे इतर अनुभवी खासदारांच्या पराभवानंतर अरविंद सावंत यांना संधी मिळाल्याचे समजते.

याबरोबरच शिवसेनेत मातोश्रीचे निष्ठावंत असा एक गट असून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे त्यात प्रमुख आहेत. अरविंद सावंत हे देसाई यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने एकच नाव सुचवताना या सर्व गोष्टींचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात आले.

राजकीय संदेशही

लोकसभा निवडणुकीवेळी मुकेश अंबानींसारख्या उद्योगपतीने अरविंद सावंत यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कॉंग्रेसचे मिलिंद देवरा यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. मुंबईतील राजकारणात वाढत्या गुजराती प्राबल्यानंतरही दक्षिण मुंबईसारख्या संमिश्र मतदारसंघातून निवडून आलेल्या अरविंद सावंत यांना मंत्रिपदी नेमत अंबानी यांनी विरोध केलेल्या आणि मराठी माणसाला सत्तेचे पद दिल्याचा राजकीय संदेश शिवसेनेने दिल्याचे एका ज्येष्ठ सेना पदाधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button