breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

MPSC च्या ९४ हजार विद्यार्थ्यांचा डाटा लीक; परीक्षेची प्रश्नपत्रिकाही असल्याचा दावा

मुंबई : एमपीएससी पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. टेलिग्रामवार लाखो विद्यार्थ्यांची संवेदनशील माहिती तसेच त्यांचे प्रवेशपत्र असा डेटा लिक झाला आहे. या टेलिग्राम चॅनलवर सुमारे एक लाख विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटासह वैयक्तिक माहिती लिक झाली असून, प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने दखल घेऊन यावर खुलासा केला आहे.

टेलिग्राम चॅनलवर सुमारे १ लाख विद्यार्थ्यांचे हॉल तिकिटाचा डेटा लिक झाला आहे. हा फक्त नमुना डेटा आहे. आमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, असा दावा टेलिग्राम चॅनलवर तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर
करण्यात आला आहे. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी आहे. याशिवाय, पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका २०२३ देखील उपलब्ध आहे, असा दावा केला आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक ट्विट करण्यात आले असून, यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button