breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

भिंतीवर साकारलेल्या चित्रातून ‘मुन्ना हेलिकॉप्टर’ची निर्मिती

  • अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू

यवतमाळ |

संपूर्णपणे देशी बनावटीचे आणि टाकाऊ वस्तू वापरून तयार केलेल्या हेलिकॉप्टरची चाचणी घेताना पंखा तुटून झालेल्या अपघातात फुलसावंगी येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम हा तरुण संशोधक ठार झाला. या घटनेची नोंद घेऊन महागाव पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हेलिकॉप्टर निर्मितीसाठी त्याने नागरी उड्डयण मंत्रालयाची परवागनी घेतली होती का, यावर तपासाचा केंद्रबिंदू निश्चित करण्यात आला आहे.

शेख इस्माईलने दोन वर्षे परिश्रम घेऊन साकारलेले ‘मुन्ना हेलिकॉप्टर’ घरात भिंतीवर साकारलेल्या चित्रातून हुबेहूब तयार केल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. या चित्रात हेलिकॉप्टरच्या सर्व बाबींची तांत्रिक माहिती, मोजमाप आहे. टाकाऊ वस्तूंपासून त्याने हे हेलिकॉप्टर तयार केले होते. त्यासाठी बंगलोर, हैदराबाद, नांदेड आदी ठिकाणाहून साहित्याची जुळवाजुळव केली. या वस्तू त्याने भंगाराच्या दुकानातून आणून त्यांना दुरुस्त करून वापरल्या. हेलिकॉप्टरच्या मुख्य पात्याला लागणारा अ‍ॅल्युमिनियमचा पत्रा त्याने हैदराबाद येथून तर मारुती ८०० या चारचाकी वाहनाचे इंजिन भंगारातून आणले होते. मुख्य दोन पाते बनवण्यासाठी त्याला जवळपास एक महिना लागला. मुख्य रोटरला झेड सिस्टम बनवायचे सर्व साहित्य त्याने हैदराबाद येथील बालनगरमधून आणले. नांदेड येथून समोरचा काच आणला. मुख्य आणि टेल रोटर तयार करायलाही एक महिना लागला. पात्याचा वेग मोजण्यासाठी लागणारे आरपीए मीटर हैदराबादवरून आणले होते. रोटरला फिरवण्यासाठी हाऊजिंग मारुती व्हॅनचे बेल्ट वापरले होते. टेल रोटरचा गिअर बॉक्स कसा असतो, हे बघण्यासाठी हैदराबाद येथे गेला होता.

तसेच बंगलोर येथेही गेल्याची माहिती पुढे आली आहे. तेथून परतल्यानंतर त्याने हुबेहूब गिअर बॉक्स तयार केला होता. टेल रोटरला दिशा देण्यासाठी अ‍ॅपे ऑटोचा क्लच व इनर- आऊटर वापरले होते. या टाकाऊ वस्तू खरेदी करून वापरण्यासाठी त्याला जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च आला. स्वत:चे काम सांभाळून तो दिवसभरातील तीन तास हेलिकॉप्टर निर्मितीसाठी देत होता, अशी माहिती त्याच्या एका नातेवाईकाने दिली. आपल्या कलेची व तंत्रज्ञानाची कोणीही नक्कल करू नये म्हणून काळजी घेत होता.

शाळेत असताना शेख इस्माईलने पीठ गिरणी, थ्री-ईन वन कुलर बनवला होता. जो फ्रिजचेही काम करीत होता. हेलिकॉप्टर निर्मितीचा ध्यास घेतल्यापासून मुन्नाने स्वत:च्या दुकानातही प्लास्टिकच्या हेलिकॉप्टरची प्रतिकृती ठेवली होती. विविध प्रकारे माहिती मिळवून तो आलेल्या अडचणी दूर करीत होता. १५ ऑगस्टला हे ‘मुन्ना हेलिकॉप्टर’ उड्डाण भरणार हा विश्वास त्याला होता. त्यामुळे १५ ऑगस्टच्या आधी याबाबत कुठेही प्रसिद्धी देऊ नये, याची काळजी त्याने घेतली होती. दुर्दैवाने कल्पक संशोधकाने भरारी घेण्यापूर्वीच त्याचा घात झाल्याने जिल्ह्यत शेख इस्माईलच्या दुर्दैवाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर महागाव पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. गुरुवारी शेख इस्माईल शेख इब्राहिम याच्या घरातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना विचारले असता, शेख इस्माईलने हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी नागरी उड्डयण मंत्रालयाची परवागनी घेतल्याचे प्राथमिक तपासात आढळले नाही. त्याबाबत चौकशी सुरू आहे. हे तंत्रज्ञान त्याने बंगलोर येथून आत्मसात केल्याची माहिती आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button