breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: चंद्रपूर जिल्ह्य़ात आरोग्य संसाधनाअभावी तेराशे रुग्णांचा मृत्यू- सुधीर मुनगंटीवार

  • महापालिकेच्या आसरा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

चंद्रपूर |

आरोग्य संसाधनांच्या अभावी जिल्ह्य़ात १३००च्या वर मृत्यू झाले आहेत, तसेच करोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना धोका संभवणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना म्हणून बालकांसाठी एक रुग्णालय तयार करावे, सीएसआरच्या माध्यमातून निधी घेऊन करोनाच्या या लढय़ात उत्तम कार्य करावे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महापालिकेच्या आसरा कोविड रुग्णालयाचे उदघाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला खा. बाळू धानोरकर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, शीला चव्हाण, आयुक्त राजेश मोहिते, विनोद दत्तात्रय आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. महापालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणासाठी भरीव कार्य केले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नासंदर्भात उपाययोजना केली आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत गोरगरिबांना मदतीसंदर्भात देखील उत्तम कार्य केले आहे. यापुढे त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात उत्तम काम करावे, असेही मुनगंटीवार म्हणाले. पालकमंत्री वडेट्टीवार, नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांनी महापालिकेच्या या कार्याचे कौतुक केले. करोना काळात समाजातील सर्वच घटक आपापल्या परीने योगदान देत आहेत. कोविड रुग्णालय स्थापन करून त्या माध्यमातून कोविड रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा महापालिकेचा पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खा. धानोरकर म्हणाले.

  • चंद्रपुरात ‘म्युकरमायकोसिस’चा पहिला बळी

चंद्रपूर : ‘म्युकरमायकोसिस’ आजाराने जिल्ह्यत मंगळवारी वरोरा येथील एका ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णावर चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून या जिल्ह्यत करोना पाठोपाठ ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण जिल्ह्यत मोठय़ा संख्येत मिळत आहे. आज घडीला जिल्ह्यत या आजाराचे ५२ रुग्ण मिळाले आहेत. त्यातील २६ बाधितांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत

  • महापौर, आयुक्तांनी दंड भरला

चंद्रपूर : आसरा कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर एक छायाचित्र समाजमाध्यमावर सार्वजनिक झाले. या छायाचित्रात महापौरांपासून पदाधिकारी, आयुक्तांपर्यंत कुणीही मुखपट्टी लावलेले नाही. त्यामुळे त्यावर समाजमाध्यमावर टीका होत असताना महापौर व आयुक्तांनी स्वत:हून नियमानुसार पाचशे रुपये दंड भरला आहे. अनवधानाने कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करीत नियमानुसार दंड भरला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button