breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: सोलापूरमध्ये ग्रामीण भागातही कोरोना फैलावतोय

संपूर्ण सोलापूर शहराला भयग्रस्त करून सोडलेल्या करोना विषाणूने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हळूहळू शिरकाव केला आहे. एकमेकांच्या थेट संपर्कात किंवा प्रवासातून करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागात करोनाबाधित १८ रुग्ण सापडले असून त्यात चौघा मृतांचा समावेश आहे.

सोलापुरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णसंख्या ६५३ इतकी वाढली असून मृतांची संख्याही ६४ वर पोहोचली आहे, तर ग्रामीण भागात आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या १८ असून त्यात चार मृतांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्ण (२ टक्के) आणि मृतांची संख्या नगण्य असली तरी ग्रामीण भागात करोनाचा मुंगीच्या पावलांनी होणारा फैलाव धोक्याची घंटा ठरला आहे.

सोलापुरात १२ एप्रिल रोजी करोनाबाधित पहिला रुग्ण सापडला होता. २५ एप्रिलपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ५० झाली असताना त्याचवेळी जिल्ह्यात सर्वप्रथम सांगोला तालुक्यातील घेरडी येथे पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, बार्शी आदी तालुक्यांमध्ये रुग्ण सापडले आहेत. अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ आदी चार तालुक्यांमध्ये चार रुग्णांचा बळीही गेला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात करोनाचा फैलाव न झाल्यामुळे आतापर्यंत निश्चिंतता बाळगली जात होती. त्यातच ग्रामीण भागातील टाळेबंदीत मोठय़ा प्रमाणात शिथिलता आल्यामुळे बरेच दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच आता हळूहळू रुग्ण आढळून येत असल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात अकरापैकी सात तालुक्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडले असताना आता माळशिरस तालुक्यातही करोना विषाणूने शिरकाव केला आहे. बार्शी तालुक्यातील वैराग येथील एका किराणा व भुसार मालाच्या ठोक व्यापाऱ्याला करोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या अकलूज येथील त्याची बहीण व भाचा अशा दोघांनाही करोनाबाधित केले आहे. वैरागच्या या व्यापाऱ्याची सुरुवातीला सोलापुरात संशयित म्हणून करोना चाचणी घेण्यात आली असता ती नकारात्मक आली होती. त्यानंतर तो व्यापारी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला असता तेथे त्याची करोना चाचणी सकारात्मक आली. तत्पूर्वी, या व्यापाऱ्याच्या आजारी आईवर सोलापुरातील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असता त्यावेळी अकलूज येथून त्या व्यापाऱ्याची बहीण व भाचा दोघेही त्याच्या संपर्कात आले होते. त्यानंतर तो व्यापारी करोनाबाधित झाला असता त्याच्या संपर्कात आल्यामुळे अकलूजमधील बहीण व भाच्याची करोना चाचणी करण्यात आली. यात दोघा माय-लेकाला करोनाबाधा झाल्याचे आढळून आले. अकलूजमध्ये करोनाबाधित महिलेच्या कुटुंबाचाही किराणा व भुसार मालाचा ठोक व्यापार आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक ग्राहक आले असण्याची शक्यता गृहीत धरून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, करोनाबाधित मायलेकाच्या संपर्कात आलेल्या मंडळींचा शोध घेऊन त्यांचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

पोलीस कर्मचाऱ्याला बाधा

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात एका पोलीस शिपायाला आपल्या गावी बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे पाच दिवसांच्या मुक्कामात करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. बाधित पोलीस शिपाई पाच दिवसांपूर्वी सोलापूरपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वत:च्या गावी बोरामणीत आई—वडिलांकडे येऊन मुक्काम करीत होता. याच दरम्यान तो आजारी पडला असता त्याला करोनाने बाधित केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बोरामणीचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button