#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाच्या २० रुग्णांची भर; महिलेचा मृत्यू
सोलापुरात आज शनिवारी करोनाबाधित २० रुग्ण आढळून आले. यात एका मृत महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या २१६ वर पोहोचली असून मृतांचा आकडा देखील १४ इतका झाला आहे. करोनाबरोबर ‘साथी’चा फैलाव वाढल्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.आज शनिवारी करोनाशी संबंधित १७५ चाचणी अहवाल प्राप्त होऊ न त्यात २० रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. यात १२ पुरुष तर ८ महिला आहेत.
शहरातील अशोक चौकात राहणाऱ्या एका ४८ वर्षांच्या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला गेल्या गुरुवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने त्याच दिवशी दुपारी तिचा मृत्यू झाला. तिचा करोना चाचणी अहवाल आज प्राप्त होऊ न त्यात करोना व सारीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी सहा रुग्ण शास्त्रीनगरातील आहेत. कुमठा नाका, नीलमनगर, एकतानगर येथे प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली. विजापूर रोडवरील मनोरमानगरात प्रथमच करोनाबाधित रुग्ण सापडला आहे.