breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: संतापजनक! करोना झाल्याच्या भीतीपोटी रुग्णालयांचा उपचार करण्यास नकार, रुग्णाला घेऊन रात्रभर कुटुंबाची धावाधाव

करोना व्हायरसची सर्वसामान्यांसोबत रुग्णालयांमध्येही भीती निर्माण झाली असून नुकताच जळगावमधील एका डॉक्टरला याचा फटका बसला आहे. ताप आणि श्वसनाचा त्रास असलेल्या या डॉक्टरला करोनाची लागण झाल्याची भीती असल्याने खासगी रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला. रुग्णालयांनी डॉक्टरला आधी आपल्या कुटुंबाकडून तुम्हाला करोनाची लागण झाली नसल्याचा पुरावा आणा अशी मागणी केली. अखेर काही तासांनंतर जळगावच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टरला दाखल करण्यात आलं. पण उपचारासाठी उशीर झाल्याने डॉक्टर सध्या व्हेंटिलेटरवर आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करोनासंबंधी योग्य माहिती नसल्याने अनेक खासगी रुग्णालयांमध्येही भीतीचं वातावरण आहे. यामुळे करोनासारखी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना ते दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत”. दरम्यान, रुग्णालयात दाखल डॉक्टरने कुठेही परदेशात प्रवास केलेला नाही किंवा करोनाची लागण झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेले नाहीत.

गेल्या आठवड्यात कोल्हापूरमधील आपल्या घरुन परतल्यानंतर त्यांना ताप आला होता. बुधवारी रात्री त्यांचा ताप वाढला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबीय रात्रभर धडपड करत होतं. “आम्ही आधी आमच्या डॉक्टरांकडे नेलं पण ते नव्हते. नंतर आम्ही इन्टेसिव्ह केअर युनिट रुग्णालयात नेलं पण त्यांनी करोना असल्याच्या भीतीने दाखल करुन घेण्यास नकार दिला. आमच्या रुग्णालयात करोनाचा फैलाव होईल असं त्यांचं म्हणणं होतं,” असं एका नातेवाईकाने सांगितलं आहे. यानंतर कुटुंबाने त्यांनी तीन रुग्णालयात नेलं. पण त्यांनीही दाखल करण्यास नकार दिला.

“आम्ही गेलो त्या प्रत्येक रुग्णालयाने आम्हाला नकार दिला. करोनाची लागण असेल तर काय करायचं अशी शंका ते व्यक्त करत होते. आम्ही त्यांना समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण कोणीही ऐकण्यास तयार नव्हतं. सर्व रात्र आम्ही एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धाव घेत होतो,” असं नातेवाईकाने सांगितलं आहे.

अखेर सकाळी सात वाजता सरकारी रुग्णालयाने दाखल करुन घेतलं आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं. आपल्याकडे इतर सुविधा नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात त्यांना हलवा असं सांगण्यात आल्यानंतर कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत मागितली. यानंतर त्यांनी रुग्णालयाला उपचार सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button