breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर घातक परिणाम होतील, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा (WHO)

करोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील असं टेड्रोस एडहानोम याचं म्हणणं आहे. जिनिवामधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही ठिकाणी करोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.

“लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील,” असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.

युरोपात करोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाउनचे निर्बंध शिथील करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. स्पेनमध्ये बांधकाम तसंच फॅक्टरी प्रोडक्शन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर जाण्याची परवानगी देण्याबद्दल विचार केला जात आहे. तर इटलीमध्येल लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पण काही छोट्या उद्योजक, दुकानांना काम करण्यासाठी परवानगी देण्याबद्दल विचार केला जात आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी सकाली ११ वाजता ही बैठक पार पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button