breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : पिंपरी-चिंचवडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका – महापौर उषा ढोरे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात करोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून प्रत्येक परिस्थितीवर मी बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, माहितीची शहानिशा केल्याशिवाय कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका करीत असलेल्या विविध उपाययोजना संदर्भात आढावा घेऊन आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य विलास मडिगेरी यांच्यासह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठी आदी उपस्थित होते.

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या स्तरावर शहरात जनजागृतीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये. आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार स्वच्छता राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच हस्तांदोलन टाळणे अशा प्राथमिक गोष्टी नागरिकांनी केल्या पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.

पक्षनेते नामदेव ढाके यांनी करोना विषाणू संदर्भात महापालिकेने आजपर्यंत केलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेतला. पालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरावर विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. प्रत्येक घडामोडीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रशासनाला सातत्याने सूचना करून आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगितले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये १० खाटांचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला होता. त्यानंतर भोसरी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयात ६० खाटांचा विलगीकरण कक्ष प्रशासनाने तातडीने उभारला आहे. याशिवाय १० खाटांचा अतिदक्षता कक्ष देखील प्रशासनाने तयार केला आहे. शहरात १०० हून अधिक पथकांद्वारे विविध ठिकाणी जनजागृतीचे काम सुरू आहे.

करोना विषाणू प्रसारावर कशी मात करावी यासाठी नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. वेळोवेळी विविध माध्यमातून याबाबत आवाहन देखील करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांमध्ये कोणतेही भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या पातळीवर नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. आम्ही महापालिका प्रशासनाला पूर्ण स्वातंत्र्य दिले असून करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही बाबींची कमतरता पडणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आम्ही आयुक्तांना दिल्या आहेत.

यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे म्हणाले, करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी तात्काळ खरेदी कराव्या लागणार आहेत त्या आयुक्तांनी त्यांच्या पातळीवर तडीने खरेदी कराव्यात. याबाबत आर्थिक स्वरूपाचे सर्वाधिकार आयुक्त यांना दिले आहेत. पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याबाबत सर्व पातळीवर दक्षता घेण्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. गरज पडल्यास जिजामाता हॉस्पिटल येथे १४ खाटांचे अतिदक्षता कक्ष सुरू करण्याची सूचना देखील आम्ही आयुक्तांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button