breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: धक्कादायक! पुणे महापालिकेची इमारतच ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती, नगरसेवकांसह तब्बल 108 कर्मचाऱ्यांना संसर्ग

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ सामान्य नागरिकांपुरता मर्यादित राहिला नाही, तर या कामातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचलेला आहे. पुण्यातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुणे पालिकेत नेहमीच वावर असलेल्या काही नगरसेवकांसह त्यांच्या जवळच्या नातलगांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यासोबतच पालिकेचे तब्बल 108 अधिकारी आणि कर्मचारी देखील बाधित आढळले आहेत. त्यामुळेच भविष्यात पुणे महानगरपालिकेची इमारतच ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विविध कामांसाठी पालिकेत शेकडो नागरिक येत असल्याने पालिकेत संसर्गाचा धोका वाढला आहे. पालिकेचे आतापर्यंत 108 अधिकारी-कर्मचारी बाधित झाले आहेत. यातील 10 कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोना बाधितांमध्ये 44 सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 108 कर्मचाऱ्यांपैकी 53 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर 45 जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 181 पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 560 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोना बाधित रुग्ण वाढल्यामुळे हवेली तालुक्यातील मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये देखील वाढ करण्यात आली. वाघोली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु हवेली तालुक्यात 6 जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 31 होती, ती आता 45 पर्यंत वाढली आहे.

पुण्यात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाला चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी 12 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. यावेळी अजित पवार यांनी अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचेही निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी प्रशासनाला हे निर्देश दिले. यात कोरोना चाचणीसाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी 8 कोटी 91 लाख रुपयांचा, तर यंत्रसामुग्रीसाठी 3 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 7 कोटी 15 लाख 81 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक तिपटीने कमी झाली. यामुळे अपघातांचे प्रमाणही पाचपटीने घटले आहे. मात्र, मोकळ्या रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढू नये, यावर आता महामार्ग पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. द्रुतगती मार्गावरुन एरवी दररोज सुमारे 30 हजार वाहनांची ये-जा होते. सध्या ही वाहतूक सुमारे 8-10 हजार वाहनांवर गेली आहे. त्यामुळे अपघात होण्याचेही प्रमाण घटले आहे. मात्र, रस्ते मोकळे असल्यामुळे वाहतुकीचा वेग वाढू नये, यासाठी भरधाव वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी 4 पथकं तैनात केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button