breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: “कोरोनावरील उपचारादरम्यान माझा मृत्यू झाला असता तर…”; ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला खुलासा

करोना संसर्गातून बाहेर आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी २७ एप्रिल रोजी पुन्हा सरकारच्या कोविड १९ विरोधी दलाची सूत्रे हाती घेतली. मात्र जॉन्सन यांना झालेल्या करोना संसर्गावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जॉन्सन यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास काय करायचे याची योजना तयार ठेवली होती अशी माहिती आता समोर आली आहे. जॉन्सन यांनीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात खुलासा केल्याचे वृत्तामध्ये म्हटलं आहे.

“हा गंभीर प्रसंग होता हे मी नाकारणार नाही,” असं जॉन्सन यांनी ‘सन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. “स्टॅलिनचा मृत्यू झाल्यानंतर ज्याप्रकारे घोषणा करण्यात आली होती तशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचे यासंदर्भात डॉक्टरांनी तयारी केली होती,” असंही जॉन्सन या मुलाखतीमध्ये म्हणाले. “माझी प्रकृती फारशी ठीक नव्हती त्यामुळे आप्तकालीन योजना तयार होती हे मला ठाऊक होतं. नियोजित योजनेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर काय करायचं याबद्दलचं नियोजन डॉक्टरांनी केलं होतं,” अशी माहिती जॉन्सन यांनी दिली.

२७ मार्च रोजी जॉन्सन यांनी त्यांना कोरनाची लागण झाल्याचे स्पष्ट केलं होतं. ‘माझ्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणं दिसत असून मी आयसोलेशनमध्ये आहे,’ असं सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला होता.मात्र त्यानंतरही त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ५ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर २४ तासांच्या आतच त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. पुढील तीन दिवस त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं. त्यावेळी “कोरनाविरुद्धच्या या लढाईचा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकला असता”, असं मत जॉन्सन यांनी व्यक्त केलं होतं.  मला रुग्णालयामध्ये दाखल व्हायचं नव्हतं पण माझ्या शरिरामधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने डॉक्टरांनी मला रुग्णालयामध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला. “डॉक्टर यांनी योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं,” असं मत जॉन्सन यांनी मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केलं.

“लोकांनी टाळेबंदीबाबत संयम दाखवून ती उठवण्यासाठी लगेच आग्रह धरू नये असे मत त्यांनी  व्यक्त केले. देश सध्या कोविड १९ साथीच्या परमोच्च बिंदूकडे वाटचाल करीत असून अजूनही खूप मोठी जोखीम आहे, सरकार  कोविड १९ साथ आटोक्यात आणण्यासाठी जे निर्णय घेईल त्यात संपूर्ण पारदर्शकता असेल,” असं जॉन्सन यांनी २७ एप्रिलला नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केलं होतं. जॉन्सन यांना गेल्या महिन्यात करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना लंडन येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी ते १० डाऊनिंग स्ट्रीट येथील अधिकृत निवासस्थानी परत आले असून १२ एप्रिलला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button