#CoronaVirus |अमेरिकेत ७० हजारांहून अधिक बळी
वॉशिंग्टन | करोनाच्या थैमानासमोर हतबल झालेल्या अमेरिकेत मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये अमेरिकेत दोन हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत करोनाच्या संसर्गाच्या बळीचा आकडा ७० हजारांहून अधिक झाला आहे. मागील काही दिवसांपासून दोन हजारांपेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाल्यामुळे अमेरिकेला काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मात्र, मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. अमेरिकेत १२ लाखांहून अधिकजणांना करोनाचा बाधा झाली आहे. तर, एक लाख ९० हजारांपेक्षा अधिकजणांनी करोनाला मात दिली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७७ लाख नागरिकांची करोनाची चाचणी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. करोनाचा सर्वाधिक संसर्ग न्यूयॉर्कमध्ये दिसून आला आहे. न्यूयॉर्कमध्ये करोनाबाधितांची संख्या तीन लाख ३३ हजारांहून अधिक झाली असून २५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ न्यूजर्सीमध्ये एक लाख ३३ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ८५०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.