#CoronaVirus: अमेरिकेत करोनाचे ४०० बळी; ३४,००० लोकांना संसर्ग
अमेरिकेत करोना विषाणूचा प्रसार वेगात होत असून एकूण ३४,००० लोकांना संसर्ग झाला असून ४०० जण मरण पावले आहेत. वल्डरेमीटर या संकेतस्थळाच्या मते करोना विषाणूचा संसर्ग ३३,५४६ लोकांना झाला असून रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांना करोनाचा ससंर्ग झाला असून मृतांची संख्या ४१९ आहे.
पॉल हे करोनाचा संसर्ग झालेले पहिले सिनेटर असून ते विलगीकरणात गेले आहेत. दरम्यान व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन या ठिकाणी करोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये १५ हजार जणांना संसर्ग झाला आहे. त्यात २४ तासात ५४१८ लोकांची भर पडली असून न्यूयॉर्क मध्ये ११४ बळी गेले त्यात एका दिवसातील ५८ बळींचा समावेश आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी सांगितले की, जीवनावश्यक औषधांचा मोठा तुटवडा पुढील दहा दिवसात जाणवणार आहे.