breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जालन्यात करोना मृतांमध्ये ६२ टक्के सहव्याधीग्रस्त

जालना |

जालना जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण एक हजार १३० रुग्णांपैकी ७०३ म्हणजे ६२ टक्के रुग्ण अन्य व्याधी असणारेही होते. एकूण मृत्यूमध्ये सर्वाधिक २७४ म्हणजे २४ टक्के मृत्यू उच्च रक्तदाब असणाऱ्यांचे आहेत. मधुमेह आणि रक्तदाब एकत्र असणारे ८१, फक्त मधुमेह ७१, अस्थमा ७६, मूत्रपिंडाचे विकार १९, पोटाचे विकार ३, कर्करोग ९ आणि अन्य विकार १७१ या प्रमाणे सहव्याधी असणाऱ्या करोना रुग्णांचा जिल्ह्य़ात मृत्यू झाला आहे. २९ जून रोजी सकाळच्या अहवालानुसार जिल्ह्य़ातील करोना मृत्यूंची एकूण संख्या वाढून एक हजार १५० झाली. यामध्ये ग्रामीण भागातील मृत्यू ६७८ म्हणजे ५९ टक्के आहेत. जालना शहरात ३०८ मृत्यू झाले आहेत. तर जालना शहरवगळता जिल्ह्य़ातील अन्य सात तालुक्यांच्या ठिकाणी १६४ मृत्यू झाले आहेत. एकूण मृत्यूंमध्ये ७३६ पुरुष तर ४१४ महिला आहेत.

जिल्ह्य़ात झालेल्या एकूण एक हजार १५० मृत्यूंपैकी १९७ म्हणजे १३ टक्क्य़ांपेक्षा अधिक बाहेरच्या जिल्ह्य़ांतून उपचारासाठी आलेल्या करोना रुग्णांचे आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १४८ म्हणजे जवळपास १३ टक्के मृत्यू बुलढाणा जिल्ह्य़ातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे आहेत. २९ जून सकाळपर्यंत जिल्ह्य़त एकूण चार लाख ९६ हजार करोना चाचण्या झाल्या. त्यामध्ये ६१ हजार १७० म्हणजे १२.३३ टक्के नमुने करोनाबाधित निघाले. ५९ हजार ८५० म्हणजे जवळपास ९८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांतील करोनाबाधितांचे प्रमाण २२.७० टक्के तर प्रतिजन चाचण्यांमधील करोनाबाधितांचे प्रमाण ४.२२ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ात करोना म्युकोरमायकोसिसचे १०५ रुग्ण आढळले असून त्यापैकी सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४० रुग्ण उपचार घेत असून ३८ रुग्ण बरे झाले आहेत. २१ रुग्णांना उपचारासाठी बाहेरच्या जिल्ह्य़ात पाठविले आहे.

  • एकूण मृत्यूंत ५१ टक्के शेतकरी

जालना जिल्ह्य़ात आतापर्यंतच्या एकूण करोना मृत्यूंपैकी ५७८ म्हणजे ५१ टक्के शेतकरी आहेत. २३५ म्हणजे २१ टक्के मृत्यू गृहिणींचे झाले आहेत. आतापर्यंत करोनामुळे जिल्ह्य़ात ७४ व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ व्यापारी जालना शहर आणि जालना तालुक्यातील आहेत. शासकीय आणि खासगी ६० नोकर करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. १९ मार्चच्या तुलनेत २९ जून रोजी एकूण करोना मृत्यूंमधील महिलांचे प्रमाण वाढले आहे. १९ मार्च रोजी एकूण करोना मृत्यूंमध्ये ३० टक्के होते. २९ जून रोजी हेच प्रमाण ३६ टक्के झालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button