Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करोनामुळे माता-पित्याचे छत्र हरपले; विपरीत परिस्थितीतही गायत्रीचे दहावीच्या परीक्षेत मोठे यश

नंदुरबार : करोनाने माता आणि पिता, दोघांचेही छत्र हरपल्यानंतर आपल्या संकटावर मात करत नंदुरबारच्या एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थिनीने मोठ्या हिंमतीने दहावीच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले. विपरीत परिस्थितीवर मात करत मिळविलेल्या या देदीप्यमान यशानंतर या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गायत्री वळवी असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती आदिवासी समाजातील आहे. इयत्ता बारावीला शिकत असणारा भाऊ आणि दहावीत असणाऱ्या गायत्रीने स्वत:ला सावरत घराची आणि स्वत:ची जबाबदारी पेलली. गायत्रीला दहावीच्या परीक्षेत ८४.४० टक्के इतके गुण मिळाले आहेत.

करोनाच्या संकटात अनेकांच्या संसाराचा गाडा अर्धावरच मोडला आणि होत्याचे नव्हते झाले. अनेक परिवार आता या दु:खातून जेमतेम सावरताना दिसत आहेत. यातीलच एक उदाहरण म्हणजे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादीत करणारी नंदुरबारच्या एकलव्य विद्यालयाची गायत्री वळवी ही विद्यार्थीनी. ३१ मे २०२१ रोजी गृहीणी असलेल्या गायत्रीच्या आईचे करोनाने निधन झाले. कुटुंब सावरत नाही तोच चारच दिवसांनी साक्री तालुक्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक असलेल् तिच्या वडिलांना ५ जून २०२१ रोजी करोनाने हिरावून नेले. अवघ्या आठवड्याभरात गायत्री आणि तिच्या भावाचे सर्व काही असलेले माता पिताच सोडून गेल्याने मुले पोरकी झाली.

हे बहीन-भाऊ एकमेकांना धीर देत पुढचे आयुष्य जगू लागली. अशातच दहावीचे वर्ष असल्याने गायत्रीने स्वत:ला सावरत ८४.४० टक्के इतके गुण संपादित केले आहेत. आपल्याला आपल्या शिक्षक राहिलेल्या वडिलांचे सर्व स्वप्न साकारायचे असल्यानेच जिद्दीने आभ्यास करुन यश संपादन केल्याचे गायत्री सांगते.

गायत्रीली तिच्या या विपरीत परिस्थीतीमध्ये मदत झाली ती तिचे वर्ग शिक्षक असलेले संतोष पाटील यांची आणि शाळेची. तिला त्यांनी धीर देत शिक्षणाकडे पुन्हा वळवले. यातूनच तिने जिद्दीने हे यश संपादीत करत स्वत:ला सिद्ध केल्याचे तिचे गुरुजन सांगतात.

आपले हे यश पाहताना आई वडिलांच्या आठवणीने गायत्रीचे डोळे पाणावत आहेत. मात्र सर्व घरकामे करुन या परिस्थीतीमध्ये तिने यशाचे जे ध्येय्य गाठले ते इतरांनाही मार्गदर्शन करणार ठरेल. करोनाच्या या महामारीत असे कित्येक संसार उघड्यावर आले. मात्र अशा छोट्या छोट्या आनंदाच्या आणि यशाच्या सोहळ्यातून ते स्वत:ला सावरत घेत असलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button